धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यातील आरोपी विनोद गंगणे यांना धाराशिव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनवली, त्यानंतर त्यांच्या वकिलांनी वैद्यकीय आजाराचे व उपचाराचे कारण देत जामिनीसाठी अर्ज केला. गंगणे यांची तब्येत खराब असुन छातीत दुखतं आहे त्यामुळे उपचाराची गरज आहे असे सांगत तात्पुरता जामीन अर्ज केला. या अर्जाच्या अनुषंगाने कोर्टाने तपास अधिकारी व सरकारी वकील यांचे म्हणणे मागितले आहे, त्यावर 13 जुन रोजी सुनावणी होणार आहे. न्यायालयीन कोठडी मिळाल्यावर गंगणे यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी रुग्णालयात नेण्यात आले.
गंगणे हे पोलिसांचे खबरी असुन त्यांनी ड्रग्ज तस्करीची माहिती दिली त्यानंतर सगळे उघड झाले आहे हे सत्य असुन पोलिसांनी सुद्धा दोषारोपपत्रात म्हणटले आहे. वैद्यकीय उपचार मिळावा, तो गरजेचा आहे, हवं तर कडक अटी लावा, उपचार झाल्यावर आत्मसमर्पण करेल, यापुर्वी केले आहे त्यामुळे तात्पुरता जामीन द्या अशी विनंती केली त्यावर कोर्टात जोरदार युक्तीवाद झाला. कोर्टाने सरकारी वकील व तपास अधिकारी यांना त्यांचे म्हणणे देण्यास सांगितले त्यावर सरकारी वकील ऍड जयंत देशमुख म्हणाले की, तपास अधिकारी यांनी म्हणणे दिले की सादर करता येईल तसेच या गुन्ह्यात ते नियमित वकील नाहीत त्यामुळे कोर्टाने 13 जुन रोजी सुनावणी ठेवली आहे.
गंगणे यांना 6 जुन रोजी अटक केल्यानंतर त्यांना 2 वेळेस पोलीस कोठडी सुनावण्यात आली, 12 जुन रोजी पोलीस कोठडी संपल्यावर त्यांना कोर्टात सुनावणीसाठी हजर करण्यात आले. जिल्हा सरकारी वकील ऍड जयंत देशमुख यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजु मांडली तर तपास अधिकारी सपोनि गोकुळ ठाकुर यांनी माहिती दिली. पोलिसांनी न्यायालयीन कोठडी मागितली, वैद्यकीय कारणाने न्यायालयीन कोठडी देताना कोर्टाने पोलिसांना तपासासाठी भविष्यात पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवला. गुन्ह्यांचे स्वरूप, तपासात मोबाईल न देणे, पोलीस कोठडीतील जास्त काळ रुग्णालयात असणे यामुळे योग्य तपास झाला नाही असे म्हणत पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवला.