संस्थाचालक व्यंकटराव गुंड यांच्यासह मुख्याध्यापक सूर्यवंशी व सहशिक्षकावर गुन्हा नोंद
पोलखोल , 25 हजार लाच मागितल्याचे प्रकरण – शिक्षकाकडुन घेतली लाच , गुंड फरार
उस्मानाबाद – समय सारथी
संस्थेतील सहशिक्षकाची वरिष्ठ वेतन श्रेणी लागू करून ती मंजूर करण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच मागून 25 हजारांची लाच स्वीकारले प्रकरणी भाजप नेते तथा नामांकीत रुपामाता समुहाचे अध्यक्ष व्यंकटराव गुंड यांच्यासह मुख्याध्यापक राजेंद्र सूर्यवंशी व सहशिक्षक अमोल गुंड यांच्यावर बेंबळी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या लाच प्रकरणी मुख्याध्यापक सूर्यवंशी व सहशिक्षक अमोल गुंड यांना अटक करण्यात आली आहे तर मुख्य आरोपी व्यंकटराव गुंड हे फरार आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. व्यंकट गुंड हे व्यवसायाने उद्योजक, शिक्षणसम्राट, बँकेचे चेअरमन,वकील आहेत. व्यंकट गुंड हे या लाचेच्या कटातील मुख्य आरोपी आहेत.
संस्थेच्या बांधकाम निधीच्या नावाखाली 50 हजार रुपये लाच म्हणून मागण्यात आली त्यात 25 हजारावर व्यंकट गुंड व मुख्याध्यापक सूर्यवंशी यांनी सेटलमेंट केली. संस्थाचालक व मुख्याध्यापक यांनी शिक्षकाला 50 हजारांची लाच मागितली आणि 25 हजार रक्कम अंतीम केली, लाचेची ही रक्कम स्वतः न स्वीकारताएका सहशिक्षक अमोल गुंड याला घ्यायला लावला होती मात्र हा सहशिक्षक लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अलगद अडकला. संस्थाचालक व मुख्याध्यापक आणि सहशिक्षक हे तिघे जण आता कायद्याच्या कचाट्यात सापडले आहेत. काम करणाऱ्या सहकारी शिक्षकाकडुन मुख्याध्यापक, संस्थाचालक व शिक्षकाने लाच मागितल्याने शिक्षण विभागातील पिळवणूकीचे वास्तव समोर आले आहे.
पाडोळी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक महाविद्यालय येथे लाचलुचपत विभागाने कारवाई केली असून या संस्थेचे संस्थाचालक व मुख्याध्यापक हे कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत. लाचलुचपत विभागाचे कर्तव्यदक्ष पोलीस उप अधीक्षक प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणात कारवाई करण्यात आली.
ही कार्यवाही पोलीस अधीक्षक डॉ. श्री.राहुल खाडे , अपर पोलीस अधीक्षक श्री. विशाल खांबे ला. प्र.वि.औरंगाबाद प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, उस्मानाबाद यांचे मार्गदर्शनाखाली गौरीशंकर पाबळे, पोलीस निरीक्षक, ला. प्र. वि. उस्मानाबाद यांनी केली. याकामी त्यांना पोलीस अंमलदार मधुकर जाधव, विष्णू बेळे, चालक दत्तात्रय करडे यांनी मदत केली.
कोणताही शासकीय अधिकारी/कर्मचारी, महाराष्ट्र शासनाचे मानधन, अनुदान घेणारी व्यक्ती, खाजगी व्यक्ती शासकीय कामासाठी अथवा शासकीय काम करून दिल्याबद्दल लाचेची मागणी करत असेल तर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, उस्मानाबाद येथे सम्पर्क करण्याबाबतचे आवाहन प्रशांत संपते, पो.उप अधीक्षक, ला.प्र.वि. उस्मानाबाद मो.नं.९५२७९४३१०० गौरीशंकर पाबळे, ला. प्र. वि. उस्मानाबाद मो. क्र. 8888813720 यांनी केले आहे.