धाराशिव – समय सारथी
राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांना भेटून त्यांचा सत्कार करण्याची हौस 3 आरोपीच्या चांगलाच अंगलट आला. मारहाण व अट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील 3 फरार आरोपीना धाराशिव येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असुन त्यातील एका आरोपीला 1 दिवसांची पोलिस कोठडी मिळाली आहे तर इतर 2 आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्यांची रवानगी धाराशिव येथील जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे. गुन्हा नोंद झाल्यापासुन हे आरोपी जुन 2024 पासुन म्हणजे गेली 6 महिने फरार होते पण मंत्र्यांचा सत्कार करण्याच्या नादात त्यांची जेलवारी झाली. हे आरोपी पालकमंत्री यांचा सत्कार करण्यासाठी धाराशिव येथील शासकीय विश्रामगृहात आले होते त्यावेळी त्यांना अटक केली, हा सगळा प्रकार तेथील सीसीटीव्हीत कैद झाला आहे. पुष्प गुच्छ द्यायला आलेल्या आरोपीच्या हातात बेड्या मात्र पडल्या, एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी ही घटना आहे.
धाराशिव जिल्ह्यातील वाशी येथे बनसोडे यांचे पारगाव टोलनाक्याजवळ हॉटेल गोवर्धन असुन त्या ठिकाणी आरोपीनी येत ज्ञानेश्वर विजय बनसोडे यांना जबर मारहाण व हॉटेलची तोडफोड केली. दोन्ही मुलांना मारहाण होऊनही पोलिस गुन्हा नोंद करीत नसल्याने त्याच्या वडिलांनी आत्मदहणाचा इशारा दिला त्यानंतर गुन्हा नोंद करण्यात आला. जुन 2024 मध्ये स्वप्नील पौळ, अविनाश मोराळे, सागर जगताप, शुभम शिंदे, स्वप्नील कोकाटे यांच्यासह 10 ते 12 आरोपीवर कलम 327, 427, 323,324 व अनुसूचित जाती अत्याचार कलमानुसार अट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला त्यातील एक आरोपी स्वप्नील कोकाटे याला 2 महिन्यानंतर ऑगस्टमध्ये अटक होती बाकी इतर आरोपी हे फरार होते. फरार आरोपी हे वाशी भागात खुलेआम फिरत होते, तक्रारदार वारंवार सांगून ही पोलिस त्यांना अटक नव्हते त्यामुळे आरोपींची हिम्मत वाढली व तिचं त्यांच्या अंगलट आली.
स्वप्नील पौळ, अविनाश मोराळे, सागर जगताप हे 3 आरोपी पालकमंत्री यांना भेटायला व सत्कार करायला धाराशिव येथे आले त्यावेळी तक्रार देखील तिथे गोशाळेच्या एका कामासाठी पालकमंत्री यांना भेटायला आले होते. तक्रारदाराला आरोपी खुलेआम फिरताना दिसले त्यानंतर त्यांनी तिथल्या पोलिसांना सांगितले व वाशी पोलिसांना फोन केला मात्र अपेक्षित प्रतिसाद न आल्याने त्यांनी पोलिस अधीक्षक यांना फोन त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची टीम पाठवत त्यांना अटक केली. आरोपी हे तिथे जवळपास 1 तास होते मात्र त्यांना कोणी अटक करीत नसल्याने त्यांची हिम्मत वाढली व तक्रारदाराची टर उडवायला सुरु केले त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेची टीम आल्यानंतर त्यांना अटक केली. तक्रारदार यांनी पोलिस अधीक्षक यांना माहिती दिली व त्यानंतर अटक झाल्याने यांना धमकीचे फोन येत असुन त्यांनी त्याची रेकॉर्डिंग पोलिसांना दिले आहे मात्र त्यावर कारवाई होत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आरोपी हे सराईत असुन त्यांच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. गुन्ह्यातील इतर आरोपीना अटक करावे अशीही मागणी त्यांनी केली आहे.