कोरोनामुळे धाराशिव व संभाजी नगर नामंतरण रखडले – शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांचा दावा
उस्मानाबाद – समय सारथी
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार मराठवाड्यात शिवसंपर्क अभियानाला सुरुवात झाली असून खासदार सदाशिव लोखंडे, आमदार कैलास पाटील यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. पक्ष संघटन वाढावे व शिवसेनेने जनतेसाठी केलेली विकास कामे लोकांपर्यंत पोहचवली जात आहेत. शिवसैनिकात या शिवसंपर्क अभियान बाबत उत्साह आहे.
कोरोनामुळे धाराशिव व संभाजी नगर हे नामंतरण रखडले असल्याचा दावा शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे यांनी शिवसंपर्क अभियान दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग येथे केला आहे.
कोरोना काळामुळे उस्मानाबादचे धाराशिव व औरंगाबादचे संभाजीनगर हे नामकरण रखडले आहे मात्र ती शिवसेनेची भूमिका आहे आणी नामंतरण करणारच आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. राणे आता भाजपात अचानक आले आहेत मात्र लवकरच मुख्यमंत्री धाराशिव व संभाजीनगर करतील असा विश्वास खासदार लोखंडे यांनी व्यक्त केला.नितेश राणे यांना माहित नसेल 2014 ते 2019 हा काळ युतीचा काळ होता, धाराशिव नावावर इतके प्रेम होते तर तो मुद्दा तेव्हाच मांडायला हवा होता असे लोखंडे म्हणाले.
उस्मानाबादचे धाराशिव तर औरंगाबादचे संभाजी नगर हे नामकरण उद्धव ठाकरे किंवा त्यांचे सरकार करू शकणार नाही, नामंतरण हे उद्धव ठाकरे यांच्या नशिबात नाही. बाळासाहेबांचे नामंतरणाचे स्वप्न हे देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री झाल्यावर पूर्ण होणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी काल तुळजापूर येथे सांगत शिवसेनेवर टिका केली होती. त्यानंतर नामांतरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला होता.
नामंतरण हा शिवसेनेचा अजिंडावरील विषय आहे. शिवसेना पक्षप्रमुख उस्मानाबादचे धाराशिव लवकरात लवकर करतील अशी अपेक्षा उस्मानाबाद करांना आहे असे सांगत नामंतरण लवकर होईल असा विश्वास आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला.
शिवसंपर्क अभियानाला उस्मानाबाद जिल्ह्यात सुरुवात झाली असून यात शिवसैनिक सहभागी होत आहेत. नळदुर्ग येथील कार्यक्रमात नगराध्यक्ष मकरंद राजे निंबाळकर, युवा सेना जिल्हाध्यक्ष अक्षय ढोबळे, सुधीर कदम,सोमनाथ गुरव, प्रवीण कोकाटे यासह पदाधिकारी उपस्थित होते.