धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील भुम येथील फय्याज पठाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे हे भुम पोलिसांना वॉन्टेड असुन त्यांचा शोध सुरु केला आहे. धाराशिव पोलिसांनी कांबळे हे वॉन्टेड असल्याचे पत्र भुम शेजारील इतर तालुका व पुणे पोलिसांना पाठवले आहे. सुप्रीम कोर्टाने कांबळे यांना शरण येण्यासाठी 15 मार्चपर्यंय मुदत दिली होती ती संपुन 3 महिने उलटले तरी ते पोलिसांना शरण आले नसल्याने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे, त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. भुम पोलिसांची 2 पथके त्यांचा शोध घेत असुन पुणे येथील घरी जाऊन आली आहेत.
आत्महत्याच्या गुन्ह्यात कांबळे यांना अटकपुर्व जामीन देण्यासाठी कोणताही ठोस आधार वाटत नाही, त्यामुळे त्यांना दिलेला तात्पुरता जामीन रद्द करण्यात येतो व त्यांना भुम येथील कोर्टात शरण (सरेंडर) होण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाच्या 2 न्यायमुर्तीच्या खंडपीठाने दिले होते. न्यायमुर्ती एम एम सुंद्रेश व एसव्हीएन भट्टी यांनी हे आदेश दिले आहेत.या गुन्ह्यातील काही आरोपीना अटक करण्यात आली आहे मात्र मुख्य आरोपी कांबळे हे फरार आहेत.
आत्महत्या प्रकरणात सुरेश कांबळे यांचा सहभाग, उपलब्ध असलेले पुरावे व तात्पुरता दिलासा दिल्यानंतर सुरेश कांबळे यांनी केलेला जल्लोष फेसबुक पोस्ट, दैनिक समय सारथी वृत्तपत्राने केलेली बातमी हे भुम पोलिसांनी सुप्रीम कोर्टात मांडले त्यानंतर जामीन रद्द करीत शरण येण्याचे आदेश दिले. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी सुप्रीम कोर्टात अहवाल दिला होता.
भुम येथील 30 वर्षीय फय्याज दाऊद पठाण या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात बार्शी येथील डॉ नंदकुमार स्वामी,अर्चना स्वामी,यश स्वामी व सुरेश कांबळे यांच्या मानसिक जाच व मारहाणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगितल्याने कलम 306,323,504,506 व 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपी सुरेश कांबळे यांना 6 महिन्यांनी तात्पुरता अटकपूर्व जामीन काही अटीसह कोर्टाने मंजुर केला, त्यानंतर त्यांच्या समर्थक, चाहत्यांनी गावोंगावी त्यांची टॅक्टरवरून मिरवणूक काढली व जेसीबीने फुलांची उधळण करीत जल्लोष केला गेला. सुरेश भाऊंचा हा नवीन पॅटर्न धाराशिव जिल्ह्यात चांगलाच गाजला यावर टीकाही झाली.
साम,दाम,दंड भेद..सिंघम, सरकार राज अश्या गाण्याच्या सुचक संदेश देणाऱ्या रिल्स व जल्लोषाचे फोटो, व्हिडिओ स्वतः सुरेश कांबळे यांनी सोशल मीडियावर टाकल्या होत्या त्या चांगल्याच अंगलट आल्या. ना मंत्री,ना खासदार,ना आमदार,ना साखर कारखान्याचा वा बँकेचा चेअरमन हे तर जनतेचे प्रेम असे सांगत सुरेश भाऊ यांनीजल्लोषाचे फोटो, व्हिडिओ, रिल्स स्वतः पोस्ट केले होते.