दिलासा – तत्कालीन मुख्याधिकारी यलगट्टे यांना अटकपुर्व जामीन मंजुर
धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांना बांधकाम व 8 अ उतारा देताना कागदपत्रे संचिका गहाळ केल्याच्या आणि फसवणुकीच्या प्रकरणात अटकपुर्व जामीन मंजुर केल्याची माहिती ऍड सुधाकर मुंडे यांनी दिली. एका प्रकरणात नियमित अटकपूर्व तर दुसऱ्या एका प्रकरणात अंतरीम जामीन मंजुर केला असुन आता केवळ त्याच्यावर दाखल असलेले अट्रॉसिटी प्रकरण प्रलंबित असल्याचे ऍड मुंडे यांनी सांगितले.
धाराशिव नगर परिषद हद्दीमध्ये पोलिस मुख्यालयासमोरील सर्व्हे नंबर 145/5 मध्ये छत्रपती हौसिंग सोसायटीमधील मंजुर रेखाकनातील प्रसाद रंगनाथ पाटील व पुजा प्रसाद पाटील हे खुल्या जागेत आणि अंतर्गत रस्त्यावर बांधकाम करीत असल्याची तक्रार उदय निंबाळकर यांनी केली होती. त्यात बांधकाम परवान्याची संचिका उपलब्ध नसल्याचे प्रथम नगर परिषदेने कळविले मात्र नंतर पाटील यांना पत्रव्यवहार केल्यावर त्यांनी परवाना सादर केला. संचिका सापडत नसल्याचा लेखी अहवाल मुख्याधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना दिला.
तत्कालीन मुख्याधिकारी हरिकल्याण यलगट्टे यांनी संगनमत करुन ऑफलाईन परवानगी दिल्याचा आरोप निंबाळकर यांनी केला.
संचिका उपलब्ध होत नसल्याबाबत गुन्हा दाखल करावा तसेच नगररचना विभागाचे सहायक संचालक यांनी सादर केलेल्या अहवालानुसार महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम 1966 चे कलम 51 नुसार कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर परिषद प्रशासन विभागाचे सह आयुक्त सतीश शिवणे यांनी आदेशीत केले होते त्यानुसार कलम 420, 465,484 अन्वये गुन्हा नोंद झाला होता.