धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर दरोडा टाकण्यात आला असुन यात करोडो रुपयांचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटून नेला आहे. तब्बल 4 किलो 120 ग्राम सोन्यासह 1 लाख 40 हजार रुपये दोन मोबाईल सहा हजार रुपये असा 1 कोटी 87 लाख 14 हजार रुपयाचा मुद्देमाल लुटून नेण्यात आला आहे. 5 दरोडेखोरांनी हा दरोडा टाकला असुन त्यापैकी 3 जणांच्या हातात पिस्टल होते, विशेष म्हणजे त्यांनी चेहरा न झाकता दरोडा टाकला असुन ते सर्वजण 5 सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत.
कॅशियर सतीश अनिरुद्ध फुटाणे यांनी फिर्याद दिली असुन अज्ञात 5 दरोडेखोरांवर कलम 395 नुसार गुन्हा आनंद नगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आला आहे.पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार बांगर यांनी तक्रार नोंद केली असुन याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक वासुदेव मोरे हे करीत आहेत. गुन्ह्याबाबत किंवा सीसीटीव्हीमधील आरोपीबाबत काही माहिती असल्यास पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन केले असुन नाव गोपनीय ठेवण्यात येते.
पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच तात्काळ तपासाला सुरुवात केली, डॉग स्कॉड श्वान पथक तिथे आले त्यांनी नगर परिषद पर्यंत माग काढला, दरोडेखोर हे नंतर समता भागात घुसले असल्याचा मार्ग श्वानपथकाने दाखविला तर फिंगर प्रिंट तज्ज्ञ यांनी हाताचे ठसे व इतर तांत्रिक पुरावे घेत तपासणी केली. आरोपी यांनी मास्क न लावता चेहरे उघड ठेवत धाडसी दरोडा टाकला त्यामुळे बाजारपेठ व नागरिकांत खळबळ उडाली आहे.
जिल्हा स्टेडियमजवळ असलेल्या सुनील प्लाझा येथील ज्योती क्रांती को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ही बँक दिवसाढवळ्या लुटण्यात आली. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक गोहर हसन,उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल राठोड, पोलिस निरीक्षक गुन्हे शाखेचे वासुदेव मोरे, शहरचे उस्मान शेख, आनंदनगर ठाण्याचे प्रवीणकुमार बांगर यांनी भेट देत तपास केला.