दानवे सुसंस्कृत नेते असल्याचे प्रश्नचिन्ह, गांभीर्याने घेण्या लायक नाहीत – आमदार राणाजगजीतसिंह पाटील
धाराशिव – समय सारथी
शिवसेना उबाठाचे नेते अंबादास दानवे व आमदार राणाजगजीतसिंह यांच्यातील शाब्दिक वाद व टोलेबाजी वाढतच आहे. आमदार राणाजगजीतसिंह हे उजनीच्या 7 टीएमसी पाण्यावरुन जनतेची दिशाभूल करीत फसवितात असा आरोप दानवेनी केला होता त्यानंतर पाटील यांनी आमने सामने चर्चेचे जाहीर आव्हान दिले होते. ते आव्हान दानवेनी स्वीकारत आमदार पाटील यांनी तारीख वेळ व ठिकाण सांगावे, मी चर्चेला येतो असे म्हणत वक्तव्यावर ठाम असल्याचे सांगितले.
दानवे हे तारीख, वेळ व ठिकाण सांगा असे म्हणाले असताना सुद्धा पाटील यांनी ती कळविली नाही. पाटील हे विषयांतर करीत चालढकल करीत असुन आमने सामने चर्चेला तयार असल्याचा केवळ कांगावा करीत आहेत असा आरोप होत आहे. दानवे यांनी गेल्या काही महिन्या पासुन पाटीलांवर जिव्हारी लागणारी टीका सुरु केली आहे तर दानवे सुसंस्कृत नेते नाहीत, त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असे म्हणत लायकी काढली.
दानवे यांना मी तर साहेब म्हटले आहे त्यांच्या विषयी जास्त बोलणे संयुक्तिक वाटत नाही. ते सुसंस्कृत नेते आहेत याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. मी गेल्या वेळेस त्यांना म्हटलं होतं की त्यांना एकदा धाराशिवला बोलवा धाराशिवला उजनीतून पाणी कसं येणार आहे हे सर्व माध्यमांसमोर सांगतो. दानवे गांभीर्याने घेण्या लायक आहेत असे मला वाटत नाही असे पाटील तुळजाभवानी गाभारा प्रकरणात प्रतिक्रिया देताना म्हणाले होते.
माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे आमने सामने चर्चेचे आव्हान या पुर्वीच स्वीकारले आहे. आमदार पाटील यांनी तारीख वेळ व ठिकाण सांगावी मी चर्चेला येतो. पाणी आले नसताना त्यांनी लोकांना फसविले आहे, या योजनेच्या सुरुवाती पासुन आजवरच्या चर्चेची माझी तयारी असुन मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे असे ते धाराशिव दुष्काळ पाहणी दौऱ्यात म्हणाले.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी उजनीचे पाणी तुळजापूरला आले आहे असे सांगून लोकांना फसविले असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. अजून काम व्हायला 2-3 वर्ष बाकी आहेत मग कसे आले 7 टीएमसी पाणी असा सवाल केला. तुळजापूरची सगळी जनता सांगेल उजनीचे पाणी आले का ? मी वास्तव सत्य बोललो. ते किती फसवणूक करतात असे म्हणाले.
यापूर्वी दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर सभेत आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर ‘दिवट्या आमदार’ या भाषेत ‘बाप’ काढुन भर सभेत टीका केली. रामदरा बंधाऱ्यात पाणी टाकून उजनीचे पाणी आले असे भासाविले गेले, पश्चिम महाराष्ट्रतील हक्काचे उजनीचे पाणी आणलं म्हणतो त्याच्या बापाने असे पाणी आणले होते का असा प्रश्न विचारत जहरी टीका केली होती. टीका करताना दानवे याचा तोल घसरला असुन त्यांनी बाप काढत डॉ पद्मसिंह पाटील यांच्यावर टीका केली. दानवे यांच्यावर ‘नासका आंबा’ अशी टीका करीत प्रतिउत्तर दिले. या आरोप प्रत्यारोपनंतर तुझी लायकी काय? मागच्या दाराने आलास, औकातीत रहा अशी तंबी समर्थकांनी फेसबुकवर दिली होती तरीही दानवेचे टीकास्त्र सुरूच आहे.
दानवे सारख्या तत्सम लोकांना जास्त महत्व देण्याची गरज नसून त्यांचे सरकार असताना त्यांनी उजनीच्या पाण्याला निधी दिला नाही, रेल्वेसाठी निधी दिला नाही, तुळजापूरचा प्रस्ताव केंद्रात पाठवला नाही. ते ज्यावेळी धाराशिवला येतील त्यावेळी समोसमोर बोलवा मग चर्चा करू असे आव्हान राणा पाटील यांनी अंबादास दानवे यांना दिले होते, ते दानवेनी स्वीकारले मात्र चर्चेचा मुहूर्त ठरत नाही.
एकीकडे दानवे यांची टीका तर दुसरीकडे शेतकऱ्यांची नाराजी अश्या स्तिथीत पाटील अडकले आहेत. कृष्णा खोऱ्यातील पाणीवाटपातून तुळजापूर तालुक्यातील पूर्व भागातील उजवी बाजू पूर्णतः वगळण्यात आली आहे. मंगरुळ, कुंभारी, काडगाव, नांदुरी, आरळी, कसईसह अनेक गावांना वगळण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. वंचित गावांतील शेतकरी व ग्रामस्थांची सर्वपक्षीय बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत ‘कृष्णा खोरे पाणी संघर्ष समिती’ स्थापन करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. शासनाने पाणीवाटपाबाबत तुळजापूर तालुक्याला न्याय न दिल्यास रास्ता रोको, धरणे आंदोलन तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला.











