आमदार राणाजगजीतसिंह पाटीलांची भुमिका निर्णायक – पाठीराखे होणार ? डॉन रोडगेंसोबतचे फोटो व्हायरल, गाभारा प्रवेश व फोटोसेशन प्रकरण
धाराशिव – समय सारथी
सोलापूर येथील तडीपारीसारखी कारवाई झालेला सराईत गुंड मटका किंग अरुण प्रभाकर रोडगे उर्फ दादा रोडगे यांच्या तुळजाभवानी गाभारा प्रवेश व फोटोसेशनचा मुद्दा चांगलाच तापला आहे. सहायक धार्मिक अमोल भोसले यांना निलंबित केल्यानंतर घडामोडीना वेग आला आहे. तुळजापूरचे नगराध्यक्ष तथा विश्वस्त विनोद विलासराव गंगणे यांना जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थांनाचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. जिल्हाधिकारी व मंदीर संस्थान आता ऍक्शन मोडवर आले असुन ठोस कारवाई अपेक्षित आहे.
गाभाऱ्यात रोडगे याच्या प्रवेशाचा ठपका गंगणे यांच्यावर ठेवण्यात आला असुन सदस्यत्व का रद्द करू नये ? याचा खुलासा 48 तासात करावा असे नोटीसीत आदेशीत केले आहे. भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर राजे कदम यांनी या घटनेची पोलखोल व तक्रार केल्यानंतर प्राथमिक चौकशीत सीसीटीव्ही आधारे मंदीर संस्थान प्राथमिक निष्कर्षा पर्यंत पोहचले आहे. दरम्यान डॉन रोडगे व गंगणे यांचे तुळजाभवानी मंदीर परिसरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
गंगणे यांचे वर्तन हे नियमास धरुन नसल्याचा व विश्वस्त या नात्याने ते आपली जबाबदारी पार पाडत नसल्याचा ठपका ठेवला आहे. कोण कधी व कसे आले याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत, त्यात लपवण्यासारखे काही नाही, योग्य ती कारवाई करण्याच्या सुचना दिल्याचे वक्तव्य आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले होते. गंगणे यांना नोटीस दिल्यानंतर आमदार पाटील यांची भुमिका ही निर्णयक, महत्वाची व न्यायय असणार आहे. ते गंगणे यांचे ‘पाठीराखे’ होतात का ? याकडे राज्यभरातील भाविकांचे लक्ष लागले आहे.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात गंगणे हे संशयित आरोपी असुन जामीनानंतर ते आमदार पाटीलांच्या कृपादृष्टी व आशिर्वादामुळे नगर अध्यक्षपदी निवडुन येत विराजमान झाले आहेत. आमदार पाटील यांचा गंगणे यांना नेहमीच ‘राजाश्रय’ राहिला आहे मात्र यावेळी त्यांनी हा प्रकार गंभीर्याने घेतला असुन ते ‘वास्तववादी’ भुमिकेत आहेत. गंगणे हे 48 तासात काय खुलासा देतात याकडे लक्ष लागले असुन त्या खुलास्यानंतर जिल्हाधिकारी कारवाईची दिशा व निर्णय घेणार आहेत. सध्या गंगणे यांचे राजकीय ग्रह नाराज व रुसल्याने वक्रदृष्टीत आहेत, त्यांना आणखी एका प्रकरणात नोटीस बजावण्यात आल्याचेही कळते.
श्रीदेविजींचे महत्वाचे उत्सवांपैकी असणार शारदीय नवरात्र महोत्सव सध्या सुरु असून नवरात्रानिमीत्त श्रीदेविजींच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक श्रीदेविजींच्या दर्शनासाठी येत आहेत. दर्शनासाठी येणारे भाविकांची सुलभ दर्शन व्यवस्था करणे, भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी अत्यावश्यक असणारी कार्यवाही अनुसरणे या महत्वाच्या जबाबदा-या विश्वस्त तसचे नगराध्यक्ष, तुळजापूर या नात्याने विनोद गंगणे यांच्यावर असून मंदिरातील नियम व शिस्तीचे पालन आपणाकडून होणे अपेक्षीत आहे.
13 ऑक्टोबर रोजी मंगळवारी श्रीदेविजींचे सकाळचे अभिषेक पूजा समाप्तीनंतर धुपारतीनंतर कांही व्यक्तींना पदाचा गैरवापर करुन श्रीदेविजींच्या मुख्य गाभा-यात दर्शनासाठी सोडल्याचे तसेच सबंधीत व्यक्तींनी दर्शनानंतर मुख्य गाभा-यात अनाधिकृतपणे फोटो काढल्याचे निवेदन या कार्यालयास प्राप्त झालेले आहे. निवेदनातील तक्रारीचे अनुषंगाने मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली अस असता सकाळी 10.58 ते 11.30 च्या दरम्यान गंगणे हे त्यांच्या कुटुंबीयासह मुख्य गाभा-यात धुपारतीस थांबल्याचे तसेच बाहेर आल्यानंतर चार ते पाच व्यक्तींना मुख्य गाभा-यात दर्शनासाठी सोडल्याचे दिसून येत असून सदर व्यक्तींनी श्रीदेविजींचे दर्शन झाल्यानंतर गाभा-यात थांबुन अनाधिकृतपणे फोटो काढल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.
श्रीदेविजींच्या अभिषेक पुजेनंतर कोणीही इतर व्यक्ती भाविक यांना मुख्य गाभा-यात प्रवेश करण्यास मनाई असल्याचा नियम गंगणे यांना ज्ञात असतानाही संबधीत व्यक्तींना मुख्य गाभा-यात प्रवेश देवून मंदिराच्या नियमांचे उल्लंघन केलेले आहे असा ठपका ठेवला आहे. या घटनेचे पडसाद समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर प्रसारीत झाले असुन यामुळे मंदिर संस्थानची नाहक बदनामी झालेली आहे.
गंगणे यांचे वर्तन हे नियमास धरुन नसल्याने तसेच विश्वस्त या नात्याने गंगणे हे आपली जबाबदारी पार पाडत नसल्याने त्यांच्याकडे असलेले विश्वस्त सदस्य हे पद का रद्द करण्यांत येऊ नये ? याचा लेखी खुलासा नोटीस प्राप्त झाल्यापासून 48 तासांचे आत जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थान अध्यक्ष यांच्याकडे सादर करावा असे आदेशीत केले आहे. खुलासा न केल्यास याबाबत काहीही म्हणने नाही असे समजुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.











