धाराशिव – समय सारथी
शिराळा उपसा सिंचन योजनेच्या पाण्यावरून परंडा तालुक्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. योजनेचे पाणी लोणी गावाजवळील मौलाई तलावात पोहोचल्यानंतर जलपूजनासाठी आलेल्या माजी आरोग्यमंत्री आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या समर्थकांना लोणी आणि शिराळा येथील ग्रामस्थांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. नागरिकांचा वाढता रोष पाहून सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी काढता पाय घेतला, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या योजनेचे पाणी मौलाई तलावात आल्याने परिसरातील बळीराजा सुखावला आहे. मात्र, या पाण्याच्या श्रेयावरून लोकप्रतिनिधी आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये जुंपली आहे. या योजनेसाठी स्थानिक शेतकऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी मोठा लढा दिला असून, अचानक राजकीय फायद्यासाठी जलपूजन करायला आलेल्या सावंत समर्थकांमुळे नागरिक आक्रमक झाले.
पाण्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही, असा पवित्रा घेत लोणी व शिराळा ग्रामस्थांनी जलपूजनास जोरदार विरोध दर्शवला. घटनास्थळी नागरिकांचा थेट रोष पाहून वाद वाढण्यापूर्वीच सावंत समर्थकांनी तिथून काढता पाय घेणे पसंत केले.
पाण्याचा थेंब अन् थेंब शेतकऱ्यांच्या संघर्षाचे फळ असताना राजकीय मंडळी केवळ फोटोसेशनसाठी येत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात पाण्याच्या श्रेयवादाचा वाद पेटला असून, आगामी काळात यावरून राजकीय वातावरण अधिकच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.











