धाराशिव – समय सारथी
गाडीच्या डिग्गीत कप्पा करून पैसे घेऊन जाणारी गाडी धाराशिव पोलिसांनी पकडली आहे. सोलापूरहून जालन्याकडे मोठी रोकड घेऊन जाणाऱ्या इनोव्हा कारला धाराशिव शहर पोलिसांनी वडगाव सिद्धेश्वर परिसरात सापळा रचून पकडले. MH 21 BQ 8886 क्रमांकाच्या या वाहनातून जवळपास 80 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव शहर पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांनी वडगाव सिद्धेश्वर परिसरात सापळा रचून ही कारवाई केली. पोलिसांनी वाहन अडवण्याचा प्रयत्न केला असता चालकाला संशय आल्याने त्याने वाहन पळवण्याचा प्रयत्न केला मात्र तो जाळ्यात अडकला.
वाहनाची झडती घेतली असता पाठीमागील बाजूस प्लायवूडची पेटी तयार करून त्यावर साउंड बॉक्स ठेवल्यासारखी रचना करण्यात आली होती. या लपविलेल्या जागेत मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली. वाहनातील दोन व्यक्तींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रोकड कोणाची, नेमकी कोठून आली, कुठे व कशासाठी नेली जाणार होती याचा तपास सुरु आहे . आयकर विभागाला सुद्धा याबाबत कळविले असुन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.











