सदस्य नाहीत तर विकास कामात ‘वाटा’ नाही, खेळी यशस्वी, ओमराजेना झटका
धाराशिव – समय सारथी
कळंब नगर परिषद पाठोपाठ धाराशिव नगर परिषदेतील शिवसेना उबाठा गटातील 5 नगरसेवक भाजपच्या वाटेवर असुन उद्या त्यांचा पक्ष प्रवेश होऊ शकतो. मल्हार पाटील यांनी यासाठी तगडी फिल्डिंग लावली असुन सर्व मागण्या मान्य केल्याचे समजते. कोटींची उड्डाणे, उपाध्यक्षपदाच्या खुर्चीची काही काळ उब व विकास कामाचा लाभ असे या ‘करारा’चे स्वरूप असल्याची माहिती आहे. स्पष्ट बहुमत असतानाही सत्तेचा सारीपाट सुरु आहे.
शिवसेना उबाठा गटासोबतच हा खासदार ओमराजे निंबाळकर यांना एक प्रकारचा धक्का मानला जात आहे. खासदार ओमराजे हे शिंदे गटात गेल्यानंतर उबाठाचे नगरसेवक त्यांच्या सोबत येऊ शकतील अशी शक्यता होती मात्र सध्या तरी ती फेल ठरताना दिसत आहे.
ओमराजे यांना नगर परिषद व जिल्हा नियोजन समितीतील विकास कामांचा वाटा हवा असेल तर नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य व त्यांचा गट दाखवा अशी अट घातली होती. आता सदस्य नाहीत तर वाटा नाही अशीच स्तिथी होणार आहे, नेमके हेच साधण्यासाठी ही खेळी केल्याचे बोलले जात आहे. दरवर्षी विकास कामात व निधीत ‘वाटा’ देण्यापेक्षा व वाद घालण्यापेक्षा ‘शिलेदार’ यांना मॅनेज करून त्यांच्यासोबत ‘OTS’ (One Time Settlement) करण्यात आल्याचे बोलले जात आहे.











