धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या कोट्यावधी रुपयांच्या निविष्ठा घोटाळ्यात कृषी विभागातील 14 अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले असुन त्यांच्यावर शिस्तभंग व सामूहिक विभागीय चौकशीची कारवाई सुरु करण्यात आली आहे. एकीकडे अधिकारी यांच्यावर कारवाई होत असताना ज्या 29 शेतकरी उत्पादक कंपन्यासह निविष्ठा पुरवठा करणाऱ्या स्टार व कृषी जगत या 2 निर्मिती कंपन्याना मात्र अभय दिले जात असल्याचे दिसत आहे. अधिकारी, कंपन्यानी संगणमत करून घोटाळा केल्याचा आरोप असुन सर्वावर फौजदारी गुन्हे नोंद करण्याची मागणी होत आहे. बोगस लाभार्थी, खोट्या सह्या, कागदपत्रे तयार केल्याने शेतकरी गटही या घोटाळ्यात तितकेच जबाबदार आहेत मात्र राजाश्रय असल्याने कारवाई होत नाही.
आमदार कैलास पाटील यांनी खरीप आढावा बैठकीत व कृषी मंत्री यांच्याकडे तर सामाजिक कार्यकर्ते भास्कर वारे यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांना तक्रार देत मुंबई समुद्रात जलसमाधी आंदोलनाचा इशारा दिला होता. शेतकरी आंदोलक अमोल जाधव यांनी धाराशिव व पुणे आयुक्त कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केले होते. दैनिक समय सारथी वृत्तपत्राने निविष्टासह वेतन, शेडनेट, सेवा वर्गसह अन्य घोटाळे व आयुक्त रफिक नाईकवाडीच्या सन्मानाची ‘सेवा निवृत्ती’ पॅटर्न आणि “घोटाळा करा पैसे भरा व मुक्त व्हा” असा पॅटर्न सुरु असल्यासह अन्य बाबी मांडत कृषी मंत्री दत्ता भरणे यांच्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह उपस्थितीत केले
एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (INM) कार्यक्रम अंतर्गत अंमलबजावणीसाठी वयक्तिक शेतकरी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी हे पर्याय असतानाही त्यातील शेतकरी कंपन्यांना प्राधान्य दिले गेले. निवडीसाठी कोणतेही निकष लावण्यात आले नाहीत, त्यासंदर्भात फाईल नोंदी उपलब्ध नाहीत. पात्रतेची पडताळणी व तुलनात्मक मूल्यमापन न करता निवड केली गेली असे चौकशी अहवालात नमुद आहे.
काही शेतकरी कंपन्यानी मयत, भुमीहीन, दुबार शेतकरी यांना निविष्ठा दिल्याचे दाखविले, त्यांच्या मते मृत्यु पश्चात शेतकरी स्वर्गात शेती केली. साहित्य खरेदी व वितरण यात ताफावत, वितरण केल्याचा पुरावा अनेक कंपनीकडे नाही. काही ठिकाणी एकच यादी वापरली असुन बोगस सही, आधार क्रमांक वापरले गेले. एकाच हस्ताक्षरात सह्या, सही बदल, वाटपाची यादी, नोंदी व फोटो नसणे, लाभार्थीकडुन लोकवाटा न घेता खोटी कागदपत्र तयार करणे यासह अन्य हेराफेरी करून शासनाला चुना लावला आहे. दुजाभाव करीत अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवून कारवाई केली मात्र राजाश्रय असलेल्या कंपन्यांना अभय दिल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
चौकशी पथकातील अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केल्यावर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. शेतकऱ्यांना कोणत्या निविष्ठा दिल्या त्याचे, साहित्याचे नाव व उपयोग सुद्धा सांगता आले नाही, हे एक प्रकारे आश्चर्य आहे. काही कंपन्यानी तर प्रत्यक्ष वितरणच्या फोटो ऐवजी स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या कार्यक्रमाचे फोटो जोडून निविष्ठा वाटप केल्याचे दाखविले. अनेकांना साहित्य वाटपाचा पुरावा चौकशी समिती समोर देता आला नाही तर काहींनी कागदपत्रे उपलब्ध करून दिली नाहीत.
गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मार्फत निविष्ठाचे गटनिहाय नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासून घेणे बंधनकारक असतानाही अहवाल प्राप्त न करताच पुरवठादार संस्थाना अनुदान अदा करण्यात आले. नमुने न घेतल्याने अनेक संशय व संगनमत असल्याचा आरोप होत असुन कारवाईची मागणी होत आहे. रब्बी हंगामाची पेरणी संपल्यावर काहींना निविष्ठा दिल्या गेल्या त्यामुळे त्याचा वापर झाला नाही. कागदोपत्री ताळमेळ घालून हा घोटाळा घालण्यात आला असुन उमरगा तालुक्यात तर चौकशी समितीने यादी, वाटप फोटो, शेतकरी स्वाक्षरी याची मागणी करून सुद्धा कागदपत्र दिली नाहीत. शेतकऱ्यांच्या हितासाठी स्थापन झालेल्या शेतकरी कंपन्यानीच डल्ला मारला आहे.
लोहारा तालुक्यातील कास्ती येथील ओम महाकाली महिला, भातागळी येथील श्री शंभो महादेव, तावशीगडची तावशीकर ऍग्रो प्रोड्यूसर कंपनीने निविष्ठा पुरवठा करण्याचे काम केले. धाराशिव तालुक्यात कौडगावची ऍग्रोनोवा, हिंगळजवाडी येथील मंजिरी सखी, भानसगावची शिवेंद्र झेड पी, धाराशिवची अण्णासाहेब उंबरे कंपनी तर कळंब तालुक्यात इटकूर येथे अमरसिंह ऍग्रो व इटकूर झेड पी ऍग्रो, लोहटा पुर्वची सृष्टी कृषी व आर के खोसे, शेळका धानोराची सरायी सखी, दहीफळची स्वयंसिद्ध शेतकरी कंपनीने निविष्ठा दिल्या.
परंडा तालुक्यात पिस्तमवाडीची श्री गणेश शेतकरी गट, पिंपरखेडची श्री साई कृषी फार्म व श्री पाटील बुबा जि प या कंपनीने, तुळजापूर तालुक्यात मंगरूळची कृषी जगत, तुळजापूरची कृषी परिवर्तन कांदा उत्पादक, कार्ला गावची श्री मल्हार शेतकरी सेंद्रिय गट, काटगावची RKSGM ऍग्रो, नळदुर्गची पिवीस ऍग्रो व काटी गावची शेतकरी कृषी परिवर्तन कंपनीने वाटप केले. भुम तालुक्यात नागेवाडीची एल के पाटील झेडपी फार्मर, इराचीवाडीची मावळा शेतकरी उत्पादक व वालवड येथील वाल्मिकेश्वर ऍग्रो कंपनीने तर उमरगा तालुक्यात मुळजची तुरोरी झेडपी फार्मर, गुंजोटीची हिरवई महिला फार्मर, येळी येथील गिरीशैल्य ऍग्रो तर नारंगवाडीची स्मृतीगंधा महिला प्रोड्यूसर कंपनीने निविष्ठा पुरवठा केला.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील चिंचोली येथील स्टार फर्टीलायझर अँड पेस्टीसाईड या कंपनीने व धाराशिव तालुक्यातील मंगरूळ येथील कृषी जगत फार्मर प्रोड्यूसर कंपनी या 2 कंपन्याकडुन सर्व तालुक्यानी निविष्ठा खरेदी केल्या. या 2 कंपन्यावर अधिकारी व शेतकरी उत्पादक कंपनी यांचे विशेष प्रेम दिसुन आले. कृषी जगत या कंपनीला तर चक्क रोखीने अनुदानाची रक्कम अदा करण्यात आली, चौकशीवेळी रोख रक्कम अदा केल्याचा कोणताही पुरावा शेतकरी उत्पादक कंपनीना सादर करता आला नाही. रोख रक्कम अदा करण्याची तरतूद नसताना हे केले गेले त्यामुळे संशय बळावला आहे.
निलंबित अधिकारी यांना मुख्यालय विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय लातुर येथे संलग्न करण्यात आले आहे. लातुर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक महेशकुमार तीर्थकर यांनी शिस्तभंग व विभागीय चौकशीचे आदेश काढले असुन नोटीस, दोषारोप जोडपत्र, ज्ञापन काढून ती जिल्हा कृषी अधीक्षक धाराशिव यांनी संबंधित 14 जणांना बजावून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. नोटीस मिळाल्यापासून 10 दिवसांच्या आत त्यांचे म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे याकडे लक्ष लागले आहे.











