धाराशिव – समय सारथी
राज्याचे कृषी विभागाचे संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफीक नाईकवाडी हे सेवानिवृत्त झाले असुन त्यांना सन्मानाने निरोप देण्यात आला, यावेळी कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सत्कार समारंभ पार पडला. नाईकवाडी हे सेवा निवृत्त होणार असल्याने त्यांना सेवानिवृत्तीसह अन्य कोणतेही शासकीय लाभ मिळण्यासाठी अडथळा येऊ नये याची पुरेपूर काळजी कृषी विभागाने घेतलेली दिसते.
कृषी विभागातील विविध योजनांमधील गैरव्यवहार तसेच शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी बेकायदेशीरपणणे सुरु केलेल्या कृषी निविष्ठा व उत्पादक कंपन्या व विक्री केंद्रे याबाबत विधानसभा सदस्य सुरेश धस यांनी तक्रार केली होती. त्यानंतर यशदाचे महासंचालक निरंजन कुमार सुधांशू यांची विशेष चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी 10 जानेवारीला तो अहवाल दिला, त्यावर ‘गतिमान’ सरकारने उचित कारवाईसाठी तो तब्ब्ल 6 महिन्यांनी कृषी आयुक्त कार्यालयात पाठविला.
धस यांची तक्रार व चौकशी अहवाल यात नाईकवाडी यांच्यासह अन्य अधिकारीवर गंभीर आरोप आहेत, असे असताना कार्यवाही जाणीवपूर्वक करण्यात आली नाही. नाईकवाडी यांच्यासह इतर अधिकारी यांची लाचलुचपत विभागाकडूनही चौकशी अनेक महिन्यापासुन प्रलंबित आहे, त्यातच नाईकवाडी सन्मानाने सेवानिवृत्त झाले तर धाराशिव येथील कृषी निविष्ठा घोटाळा प्रकरणात दोषी 17 अधिकारी यांना सुद्धा अभय देण्याचे काम होताना दिसत आहे, त्यातील जिल्हा कृषी अधीक्षक राजकुमार मोरे हे सुद्धा सेवानिवृत्त झाले. अधिकारी सेवानिवृत्त होण्याची वाट पाहिली जाते असेच दिसते.
एकात्मिक कीड व्यवस्थापन व एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन योजनेत निविष्ठा ह्या शेतकरी कंपनी व गटांना खरेदी करता याव्यात व त्या खुल्या बाजारातून खरेदी करण्याचे स्वातंत्र्य राहील यासाठी काढण्यात आलेल्या आदेशात नाईकवाडी यांचा मोठा वाटा आहे. राज्यात काही ठराविक कृषी कंपनीकडुन या निविष्ठा खरेदी केल्या जातात त्यात अधिकारी यांच्याशी संबंधित, त्यांचे नातलग व साखळीतील कंपन्या असतात. धाराशिव जिल्ह्यातील एक कंपनी असल्याचे कळते. दर्जाहीन निविष्ठा शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जातात शिवाय मयत, भुमीहीन शेतकरी यांच्या नावाने दाखवून पैसे लाटण्यात आले.
धाराशिव जिल्ह्यातील महाघोटाळ्यात तब्ब्ल 17 अधिकाऱ्यांना दोषी ठरविण्यात आले असुन 2 कोटी 32 लाख रुपयांची अनियमितता झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी व शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली असुन तसे दोषारोप पत्र पाठविले आहे. आमदार कैलास पाटील यांनी याची तक्रार केल्यानंतर हा महाघोटाळा उघड झाला. धाराशिव येथेही मंत्री भरणे जातीय समीकरणामुळे अभय देत असल्याचा आरोप होत आहे.
2 जिल्हा कृषी अधीक्षक, 8 तालुका कृषी अधिकारी, 4 मंडळ कृषी अधिकारी यांचा धाराशिव घोटाळ्यात समावेश आहे. विभागीय कारवाई, शिस्तभंगाची जुजबी कारवाई करून हा महाघोटाळा दडपला जात आहे. अर्थपुर्ण व्यवहारामुळे काही लोकप्रतिनिधी यांचे छुपे पाठबळ मिळत असल्याची सुत्रांची माहिती आहे. शेतकऱ्यांच्या योजनेवर डल्ला मारणाऱ्या या अधिकाऱ्यांकडुन रक्कम वसुलीची कारवाई करून गुन्हा नोंद करण्याची मागणी होत आहे.











