काळेंचा हल्लाबोल, पक्षश्रेष्टीकडे तक्रार, भेटायला जाणार – आमची 35 वर्षांची तपस्या, त्यांना आसुरी आनंद
धाराशिव – समय सारथी
राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे भाजप संपर्कमंत्री जयकुमार गोरे हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृहात भाजप पदाधिकारी यांच्या गाठीभेटी घेत बैठक घेतली. यावेळी भाजपचे माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ऍड अनिल काळे यांना मंत्री गोरे यांना भेटण्यापासुन आमदार पाटील यांनी अडविले व बाहेर थांबण्यास सांगितले. पक्षाच्या मंत्र्यांना भेटण्यापासुन अडविल्याने काळे यांनी तिथेच मंत्र्यांना भेटून जाहीर नाराजी व्यक्त केली, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सर्व प्रकारानंतर काळे हे चांगलेच आक्रमक झाले असुन पक्षश्रेष्टी यांना भेटून जिल्ह्यात कार्यकर्ते व पदाधिकारी यांना मिळणारी वागणूक, आमदार पाटीलांचा कारभार याची वस्तुस्तिथी व व्यथा मांडणार असल्याचे सांगितले. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुनील राणे यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचे काळे म्हणाले.
कार्यकर्ते हे किरकोळ, फालतू आहेत, त्यांचे योगदान काय ? असा त्यांचा शुद्ध गोड गैरसमज त्यांचा आहे, कार्यकर्तेना किंमत न देणे, पदोपदी तुच्छ वागणुक देऊन चारचौघात अपमान करणे यात आमदार पाटील यांना कदाचित आसुरी आनंद मिळत असावा. मात्र आता हे सहन केले जाणार नाही. राणा पाटील हे पक्षाचे चालक मालक नसुन त्यांचे हे वागणे हुकूमशाहीचे लक्षण आहे असा आरोप केला.
माझी पक्षात 35 वर्षांची तपस्या आहे, मी कोणाच्या मिंद्यात नाही, त्यामुळे मला घाबरण्याची गरज नाही. पदाधिकारी यांना कमी लेखून बुद्धीभेद करीत अपमान करणे हे नित्याचे झाले असुन अनेक जण अश्या हुकूमशाही वागण्याने नाराज आहेत. कार्यकर्ते पदाधिकारी यांचा नेत्यांशी संपर्क होऊ दिला जात नाही, त्यांचा हा राष्ट्रवादीत असल्यापासूनचा छंद आहे मात्र भाजपात हे चालणार नाही असे काळे म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, नेते सुनील राणे यांना फोन करून व्यथा मांडली आहे. त्या सर्वांना या प्रकाराचा धक्का बसला आहे. माझ्या सारख्या भाजपा पदाधिकारी याची ही स्तिथी असेल तर कार्यकर्ते याची काय स्तिथी असेल असे पक्षश्रेष्टी म्हणाले. कार्यकर्ता पक्षाचा आत्मा असतो, कार्यकर्ते जीवावर पक्ष आहे, आम्ही सोबत आहोत असे आश्वासन पक्षश्रेष्टी यांनी दिल्याचे काळे म्हणाले.
माझी 35 वर्षाची पक्षातील तपस्या, 2019 ला पाटील पक्षात आल्यावर त्यांना पक्ष म्हणुन साथ दिली याचा अर्थ नाही की आम्ही तुमचे गुलाम आहोत. या प्रकारानंतर असंतोष समोर आला असुन ठिणगी पडली आहे, आगामी काळात हा वनवा पेटणार असल्याचे म्हणत त्यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर व त्यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले.
हे माझ्या बाबतीत घडले असे अनेक वेळा इतर लोकांसोबत घडले असल्याचे अनेकांनी फोन करून सांगितले. माझी कोणतीही चुक नसताना दंडमशाही करून अडविले मात्र मी त्याला घाबरणारा नाही. आम्ही मंत्री गोरे यांची वाट पाहत बसलो होतो, गर्दी असल्याने माजी आमदार ठाकूर यांच्या सोबत गेलो. त्यावेळी आमदार पाटील यांनी तुम्ही थांबा असे म्हणाले. मी का थांबू ? काय संबंध ? माझा पक्षाचा मंत्री आहे असे म्हणताच जास्त बोलु नका असा दम त्यांनी भरला. नंतर मी मंत्र्याकडे गेलो व प्रकार सांगितला, माझे त्यांच्याकडे कोणतेही काम नव्हते मात्र पक्षाचा मंत्री असल्याने आम्ही भेटायचे नाही का ? जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांच्या मध्यस्तिथीने तणाव मिटला.
ड्रग्ज प्रकरणात गुन्हेगार यांना पाठीशी घालणे, अनेक लोकांचे संसार उध्वस्त करणारी कला केंद्र सुरु होण्यासाठी छुपे प्रयत्न करणे, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना राजाश्रय दिल्याने पक्षाची बदनामी होत असुन यासह अन्य बाबी पक्ष श्रेष्टीकडे मांडणार असल्याचे काळे म्हणाले. एक टेंडर काढुन ठेकेदार जपण्याचे उद्योग कसे सुरु आहेत, त्यांच्या इतर स्पेशालिटी व उद्योग पक्षाला सांगणार आहे. 2 दिवसात मुंबईला जाऊन जिल्ह्यातील अनेकांनी सांगितलेले प्रकार व व्यथा मांडणार आहे असे ते म्हणाले.











