धाराशिव – समय सारथी
धाराशिव तुळजापूर रेल्वेमार्गाचे सुमारे 3 हजार कोटींचे काम जून 2027 पर्यंत पूर्ण होऊन या मार्गावर रेल्वे धावण्यास सुरुवात होईल, तर तुळजापूर–सोलापूर टप्पा डिसेंबर 2029 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी यावेळी दिली. आपला जीव धाराशिव – व्हिजन 2030′ हा मोहिमेचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या संकल्पना व पुढाकारातून अनेक विकास कामे करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. त्या कार्यक्रमात आमदार पाटील बोलत होते.
पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारकडून या प्रकल्पासाठी राज्याच्या वाट्याचा निधी न मिळाल्याने कामाला विलंब झाला. मात्र, महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील साडेतीन हजार कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असून, प्रत्येक बूथमागे पाच महिलांना उद्योगासाठी शासकीय अनुदान किंवा कर्जाच्या माध्यमातून सहाय्य केले जाणार आहे. आतापर्यंत 2 हजार 700 महिलांची नोंदणी पूर्ण झाली असून उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. धाराशिव जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी पीपीपी तत्त्वावर मान्यता देण्याची मागणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पाणी, रेल्वे, रोजगार आणि पर्यटन क्षेत्रातील आपल्या जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प मोठ्या गतीने मार्गी लागत असून, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.











