धाराशिव – समय सारथी
ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्यानंतर विकास निधी व रखडलेली कामे पुर्ण करण्याच्या नावाखाली शिवसेनेच्या 6 खासदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली. त्यात धाराशिव लोकसभेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे होते. ओमराजे यांनी पक्ष सोडल्यावर आमदार कैलास पाटील यांनी यशस्वी खिंड लढवली असुन त्यांना शिवसैनिक यांचा चांगला पाठिंबा मिळाला.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कळंब नगरीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. कळंब येथे निष्ठावंत शिवसैनिकांनी प्रचंड उत्साहात आणि जल्लोषात त्यांचे जंगी स्वागत केले. मुसळधार पावसाची पर्वा न करता हजारो शिवसैनिक, पदाधिकारी, महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. पावसाच्या प्रत्येक सरीतून शिवसेनेप्रती असलेली निष्ठा, उद्धव ठाकरेवरील प्रेम आणि पक्षावरील अढळ विश्वास स्पष्टपणे दिसून आले.
अभूतपूर्व प्रतिसादाने कळंब तालुक्यातील शिवसेनेची ताकद, संघटनशक्ती आणि निष्ठावंत शिवसैनिकांचा उत्साह पुन्हा एकदा अधोरेखित झाला. मुसळधार पाऊसही शिवसैनिकांचा जोश कमी करू शकला नाही; उलट पावसातही ठामपणे उभे राहून त्यांनी आपल्या नेतृत्वावरील निष्ठा कृतीतून दाखवून दिली. निष्ठा हीच आमची ओळख आणि उद्धव ठाकरे हेच आमचे नेतृत्व असा नारा शिवसैनिकांनी दिला.












