धाराशिव – समय सारथी
खासदार ओमराजे यांच्या सकट 6 खासदारांचे मी महायुतीत मनापासून स्वागत करतो. ते राजकीय प्रतिस्पर्धी बिलकुल नाहीत, ते स्वतः महायुतीत आता आली आहेत ना असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले. यावेळी त्यांनी ओमसह सगळ्यांचे स्वागत करतो असे म्हणत ‘ओम’ असा हक्काने उल्लेख केला. ओमराजे हे प्रतिस्पर्धी नसल्याचे त्यांनी जाहीर करीत वादावर पडदा टाकला. विरोधी पक्षात असताना त्या दोघात ‘बाळ’ आहेस तु, यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात जुपंली होती.
वेळ आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांचे हात बळकट करण्यासाठी 100 टक्के कार्यकर्ता म्हणुन आम्ही पुर्ण काम करू अशी प्रतिक्रिया मल्हार पाटील यांनी दिली. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यावर डॉ पाटील यांच्या परिवारासाठी कदापि मते मागणार नाही, मी त्यांच्या मांडीला मांडी लावुन बसणार का ? मी मांडीला मांडी नाही तर त्यांच्या उरावर जाऊन बसणार आहे. माझी भुमिका तडजोडीची कधीही राहणार नाही, असे म्हणाले होते. तुम्ही पाटील परिवारासाठी मत मागणार का ? असे मल्हार पाटील यांना विचारल्यावर ते म्हणाले की आपण महायुती बळकट करण्यासाठी मते मागू.
थोडक्यात आमदार राणाजगजीतसिंह पाटील व त्यांच पुत्र मल्हार पाटील यांनी त्यांच्या बाजूने विरोधी भुमिका नसल्याचे जाहीर केले. उलट कै पवनराजे यांची हत्या झाली त्यात संबंध नसताना राजकीय षडयंत्र रचून आरोपी करण्यात आले, त्याला काही जण बळी पडले. हे षडयंत्र कोण व का केले, यात कोण कोण प्यादे होते, हे योग्य वेळी समोर आणेल. कधी सांगायचं आणि पर्याप्त पुरावे उपलब्ध करून दयायचे हे मी ठरवेन दुर्दैवी घटनेचा वापर राजकारणासाठी झाला, असे आमदार पाटील म्हणाले.
पवनराजे यांची हत्या नेमकी कोणी केली, त्याची कारणे काय होती, ही आमची मागणी असणार आहे. अनेक बाबी कोर्टाच्या समोर आल्या असुन या प्रकरणाचा योग्य तपास झाला तर खरे आरोपी कोण आहेत हे आजही निदर्शनास येऊ शकते असा ठाम विश्वास असल्याचे ते म्हणाले. नेमकं हे कोणी केले याचा तपास करून हे समोर आले पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. डॉ पाटील यांच्यासह सर्व 9 जणांची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे.
मल्हार पाटील यांनी सुद्धा ओमराजे यांचा शाब्दिक उद्धार केला होता. ओम्या औकातीत रहा, नाहीतर गाठ माझ्याशी आहे असे म्हणाले होते. ओमराजे यांच्या पक्ष प्रवेशानंतर पाटील पिता पुत्रांनी भुमिका बदलून राजकीय परिपक्वता दाखवली. वरवर का होईना, वाद नसल्याची भुमिका स्पष्ट केल्याने ओमराजे यांची पुन्हा कोंडी केली आहे.












