धाराशिव – समय सारथी
खताच्या नावाखाली माती व बोगस खत माथी मारल्याचा प्रकार शेतकरी यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला असुन शेतकऱ्यांनी 500 बॅगा असलेले 3 टेम्पो पकडून प्रशासनाच्या हवाली केले. पकडलेले हे टेम्पो शेतकऱ्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणुन बॅगा फोडून खत अधिकाऱ्यांना दाखवीत आंदोलन केले. घटनास्थळी पोलिस व कृषी विभागाचे अधिकारी आल्यानंतर पंचनामा करण्यात आला.
अणदूर येथील ओंकार कृषी सेवा केंद्रातून खरेदी केलेल्या खताबाबत शेतकऱ्यांनी गंभीर आरोप केले. ‘शेतकरी राजा’ शेतकरी ऍग्रो कॉपोरेशन असे या बॅगावर लिहले असुन द महाराष्ट्र फर्टीलायझर अँड केमिकल्स नांदेड येथे हे उत्पादीत केल्याचे व चंदगड कोल्हापूर जिल्हा येथुन मार्केटिंग केल्याचे लिहले आहे.
15:15:10, 18:46, 20:20:13 यासारख्या विविध एनपीके खतांचे लेबल असले तरी प्रत्यक्षात सर्व बॅगांमध्ये एकाच प्रकारचा संशयास्पद पदार्थ भरलेला असल्याचा दावा करण्यात आला. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर खताच्या बॅगा फोडून निषेध व्यक्त केला.
बॅगांमधील पदार्थ हा खत नसून लाल गेरू मातीच्या गाठी असल्याचा आरोप करण्यात आला. हा पदार्थ हातात घेऊन दाबल्यास चिखल तयार होत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.












