धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील जिजाऊ चौक ते बोरफळ (राज्य मार्ग क्र. 68) रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदारावर व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
धाराशिव शहरातील जिजाऊ चौक ते बोरफळ (राज्य मार्ग क्र. 68) रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून संथ गतीने सुरू असून या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत. बऱ्याच दिवसांपासून सुरु असलेल्या या रस्त्याच्या अपूर्ण काम आणि निष्काळजीपणामुळे 5 मे च्या रात्री सांजा गावाच्या पुढे पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी कोणतेही संरक्षण कठडे, इशारे किंवा रेडियम चिन्ह, दिशादर्शक चिन्ह नसल्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने भंडारवाडी येथील ओम दिलीप अंधारे या युवकाची दुचाकी पुलासाठी खणलेल्या खड्ड्यात जाऊन आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.
दोन दिवसांपूर्वी पुलासाठी खणलेल्या याच खड्ड्यात एका स्कॉर्पिओ गाडीचा अपघात होऊन तीन ते चार जण गंभीर जखमी झाले होते, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. संबंधित ठेकेदार, अधिकारी यांना संरक्षण कठडे, इशारे किंवा रेडियम चिन्ह, दिशादर्शक चिन्हांचा वापर करावा याबाबत वारंवार कल्पना देऊनही त्यांनी कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजना केलेली नाही. MSIDC मार्फत सुरु असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी कोणताही सरकारी अधिकारी पूर्णवेळ नियुक्त केलेला नाही.
कामाचा दर्जा, देखरेखीसाठी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहण्याच्या सूचना देऊनही ते कामाच्या ठिकाणी उपस्थित राहत नाहीत. संपूर्ण मराठवाड्यासाठी फक्त एक कार्यकारी अभियंता नियुक्त केलेला असल्याने कामाचा दर्जा राखणे व वेळेवर काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने सदरील कामाची जबाबदारी त्यांच्यावर असून कामाच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असतानाही ते जाणीवपूर्वक उपस्थित राहत नाहीत.
रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून संथ गतीने करणाऱ्या व कामाच्या ठिकाणी कोणतेही संरक्षण कठडे, इशारे किंवा रेडियम चिन्ह, दिशादर्शक चिन्हाचा वापर न करणाऱ्या ठेकेदारावर व सदरील कामाचा दर्जा राखणे व वेळेवर काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने कामाची जबाबदारी असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विधिमंडळ कामकाजासाठी अवगत करावा असे पत्र पोलिस अधीक्षक यांना दिले आहे.











