धाराशिव – समय सारथी
खत व बियाणे विक्रीत अनियमिततेसह अन्य कारणाने 15 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी 1 केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात आला आहे तर 14 केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांची तपासणी मोहीम राबवत मोठी कारवाई केली होती.
ई पॉस मशिननुसार साठा न जुळणे, परवान्यातील स्त्रोतांव्यतिरिक्त इतर निविष्ठांची विक्री, साठा रजिस्टर अद्ययावत न ठेवणे, शेतकऱ्यांना नमुन्यात पावती न देणे, खरेदी बिलांचा अभाव अशा गंभीर त्रुटी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. अधिक दराने विक्री, लिंकिंग पद्धतीने खत बियाणे देणे, गोदामातील साठ्याची नोंद न करणे अशा प्रकारांवरही लक्ष ठेवले आहे.उमरगा येथे सर्वाधिक 4, भुम 3, परंडा, कळंब व वाशी प्रत्येकी 2, धाराशिव व तुळजापूर 1 अश्या केंद्राचा समावेश आहे.












