धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा अखेर कला केंद्र मुक्त झाला असुन तुळजाई, पिंजरा, कालिका, महाकाली, गौरी, साई ही 6 कला केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले आहेत, त्यातील काहींना सील ठोकले आहे. कला केंद्राच्या नावाखाली अनेक ठिकाणी गैरप्रकार सुरु असल्याची व तिथे गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याची वस्तुस्तिथी दैनिक समय सारथी वृत्तपत्राने मांडल्यानंतर परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी कारवाईचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक रितु खोकर यांनी धाडी टाकत अहवाल मागवीत परवाने रद्द केले. धाराशिवच्या इतिहासात प्रथमच सर्व कला केंद्र परवाने रद्द झाल्याने जिल्हाधिकारी यासह प्रशासनाचे कौतुक अभिनंदन होत आहे.
धाराशिव जिल्ह्यातील काही भाग हा कला केंद्राचा ‘अड्डा’ बनत चालला होता, मात्र त्याला वेळीच आळा घालण्यात प्रशासनाला यश आले. ‘कला केंद्र युक्त’ ते ‘कला केंद्र मुक्त’ यात अपर जिल्हा दंडाधिकारी तथा निवासी उप जिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर, धाराशिवचे उप विभागीय दंडाधिकारी ओंकार देशमुख, कळंब विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी गणेश शिंदे, धाराशिव तहसीलदार मृणाल जाधव,वाशी तहसीलदार प्रकाश मेहेत्रे, कळंब तहसीलदार हेमंत ढोकळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्यासह इतर पोलिसांची भुमिका महत्वाची ठरली.
वाशी तालुक्यातील पिंपळगाव येथील तुळजाई कला केंद्र येथील नर्तिका पुजा गायकवाड हिच्या नादाला व ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील लुखमसाला या गावचे उपसरपंच गोविंद बर्गे यांनी डोक्यात गोळी घालुन आत्महत्या केल्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्राचा विषय ऐरणीवर आला. पुजा गायकवाड ही जामीन झाल्यावर नंतर सोलापूर जिल्ह्यात एका कला केंद्रावर अनैतिक कामात पकडली गेली. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम ताई गोऱ्हे यांनी कला केंद्राची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी केली.
तुळजाई कला केंद्रावरील प्रकार समोर आल्यावर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ परवाना कायमस्वरूपी रद्द करीत सील केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या 3 पथकांनी इन कॅमेरा टाकलेल्या धाडीनंतर महाकाली, पिंजरा, कालिका, गौरी व साई कला केंद्रावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्यात 2 तर येरमाळा पोलिस ठाण्यात 3 गुन्हे नोंद केले, त्यानंतर पिंजरा, कालिका, साई व नंतर गौरी कला केंद्र परवाना रद्द केला, त्यातील काही जण जिल्हाधिकारी यांच्या निर्णयानंतर विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात गेले मात्र तिथे जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक यांनी ठोस भुमिका मांडली. दैनिक समय सारथीने वारंवार पाठपुरावा केला.
काही पक्षीय पदाधिकारी हे कला केंद्र सुरु व्हावेत यासाठी पालकमंत्री यांना भेटून शिफारस करीत होते मात्र पालकमंत्री सरनाईक यांनी शेवटपर्यंत भुमिका ठाम ठेवली व शिफारस करणाऱ्या पदाधिकारी यांचे कान टोचले. अशी शिफारस घेऊन कोणत्याही राजकीय पक्षातला पदाधिकारी, कार्यकर्ता आला तर त्याला केराची टोपली दाखवण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले.
कला केंद्राच्या नावाखाली कोणत्याही प्रकारे चुकीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, सर्वसामान्य तरुणाचा जीव वेठीस धरू देणार नाही असे पालकमंत्री म्हणाले होते. अनेक तरुण, कुटुंब हे कला केंद्रच्या जाळयात अडकून बरबाद झाले तर काही ठिकाणी आत्महत्या केल्याच्या घटना झाल्या आहेत. गोळीबार, हत्या, हाणामारीसह इतर प्रकार नित्याचे झाले होते. पिंजरा, महाकाली व साई कला केंद्र या 3 केंद्रावर एका विवाहित महिलेला कलेच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करायला भाग पाडल्याप्रकरणी 9 जणांवर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला तर काही ठिकाणच्या नर्तिका पुर्वी लॉज व इतर ठिकाणी सापडल्या होत्या.











