धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द केल्यानंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या आदेशानंतर हे कला केंद्र सील करण्यात आले. महसूल व पोलिस विभागाणे संयुक्तपणे ही कारवाई केली. कला केंद्रातील सर्व रूम व मुख्य प्रवेशद्वार याला टाळे ठोकून पंचनामा करून सील करण्यात आले. या कारवाई नंतर अखेर विविध कारणांनी वादग्रस्त ठरलेले हे केंद्र बंद झाले. इथे हत्या, गोळीबार, हाणामारी सारख्या घटना घडल्या होत्या.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी कला केंद्र बाबत ठोस भुमिका घेत कार्यवाहीचे निर्देश दिले होते. दैनिक समय सारथी वृत्तपत्राने या विषयाचा पाठपुरावा केला आहे. महाकाली कला केंद्रावर अनेक नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचा व तिथे झालेल्या हाणामारीच्या घटना, दाखल गुन्हे व इतर बाबींचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हा दंडाधिकारी विद्याचरण कडवकर, तहसीलदार हेमंत ढोकळे यांनी कोर्टात दाखल केला.
पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी कला केंद्र सील करण्याचा प्रस्ताव दिला होता त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक संग्राम भालेराव, पोलिस हवालदार किरण शिंदे, महमद सय्यद, येरमाळा मंडल अधिकारी नारायण नागटिळक,चोराखळीचे तलाठी प्रवीण जमादार, कोतवाल नारायण पवार यांच्या पथकाने सील केले.
छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने स्थगिती उठवण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी तात्काळ यंत्रणा हलवीत कला केंद्र सील करण्याचे आदेश दिले होते. कला केंद्र मालक राजाभाऊ सीताराम माळी यांनी कोर्टात दाखल केलेली याचिका कोर्टाने खडेबोल सुनावल्यानंतर मागे घेतली. न्यायामुर्ती वैशाली पाटील जाधव व नितीन सूर्यवंशी यांच्या खंडपीठाने आदेश दिले, सरकारी वकील पी के लखोटीया यांनी सरकारची बाजु मांडली.
कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्र चालु करण्यासाठी राजाभाऊ माळी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे 7 फेब्रुवारी 2023 रोजी अर्ज केला होता, तो 28 एप्रिल रोजी निकाली काढत अर्ज नामंजूर केला. पोलिस अधीक्षक यांनी 23 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी यांना एक लेखी अहवाल पाठवला, त्यानुसार माळी यांनी महाकाली कला केंद्र हे अक्षय साळुंखे यांना चालवण्यासाठी भाडेतत्वावर दिले आहे. कला केंद्रात पारंपरिक वाद्यावर कला सादर करणे अपेक्षित असताना साउंड सिस्टीमवर सांस्कृतिक नृत्य करताना मिळून आलेले आहे.
उपविभागीय अधिकारी कळंब यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी व तपासणी करून चौकशी अहवाल 12 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी यांना सादर केला त्यानुसार कलाकेंद्रात अनेक नियमांचा भंग व त्रुटी असल्याचे नमुद केले. कला केंद्राच्या इमारतीचे बांधकाम परवानाबाबत कोणतेही कागदपत्र दिसून आलेले नाहीत. प्रत्यक्ष पाहणीत सदर ठिकाणी अंदाजे 50 आर क्षेत्रावर कला केंद्राचे बांधकाम दिसून आले. प्रवेश व बाहेर पडण्यासाठी दोन स्वतंत्र मार्ग नाहीत. नियमानुसार रंगमंच उभारलेला नसून रंगमंचावर कोणतीही व्यवस्था दिसुन आली नाही. प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था नाही.












