धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील महाकाली कला केंद्र प्रकरणात छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने स्थगिती उठवण्याचे आदेश दिले आहेत, कला केंद्र मालक राजाभाऊ सीताराम माळी यांनी कोर्टात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. पोलिस व महसूल विभागाने हे कला केंद्र बंद करावे असा प्रस्ताव पाठवला होता त्यातच कोर्टाने स्थगिती उठवल्याने महाकाली कला केंद्रचा परवाना कायमस्वरूपी रद्द करीत ते सील करण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे. न्यायामुर्ती वैशाली पाटील जाधव व नितीन सूर्यवंशी यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले, सरकारी वकील पी के लखोटीया यांनी सरकारची बाजु मांडली.
याचिकाकर्त्याकडे कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्याने उच्च न्यायालय हे प्रकरण सुनावणीस इच्छुकता दर्शवली नाही त्यानंतर वकिलांनी याचिका मागे घेण्याची परवानगी मागितल्याने परवानगी देण्यात आली तसेच जिल्हाधिकारी यांनी अंतीम निकालापर्यंत कारवाई करू नये हा दिलेला अंतरिम दिलासा रद्द करण्यात आला. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी कला केंद्र बाबत ठोस भुमिका घेत कार्यवाहीचे निर्देश दिले होते. दैनिक समय सारथी वृत्तपत्राने या विषयाचा पाठपुरावा केला आहे.
महाकाली कला केंद्रावर अनेक नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याचा व तिथे झालेल्या हाणामारीच्या घटना, दाखल गुन्हे व इतर बाबींचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, अपर जिल्हा दंडाधिकारी विद्याचरण कडवकर यांनी कोर्टात दाखल केला. पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी कला केंद्र सील करण्याचा प्रस्ताव दिला आहे त्यामुळे जिल्हाधिकारी आता काय कार्यवाही करतात याकडे लक्ष लागले आहे. कारवाई झाल्यास धाराशिव जिल्हा कलाकेंद्र मुक्त होणार आहे, इतर सर्व 5 केंद्राचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत.
कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्र चालु करण्यासाठी राजाभाऊ माळी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे 7 फेब्रुवारी 2023 रोजी अर्ज केला होता, तो 28 एप्रिल रोजी निकाली काढत अर्ज नामंजूर केला होता, त्यामुळे ते आता चालु ठेवण्याचा प्रश्न नाही. पोलिस अधीक्षक यांनी 23 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी यांना एक लेखी अहवाल पाठवला, त्यानुसार माळी यांनी महाकाली कला केंद्र हे अक्षय साळुंखे यांना चालवण्यासाठी भाडेतत्वावर दिले आहे. कला केंद्रात पारंपरिक वाद्यावर कला सादर करणे अपेक्षित असताना साउंड सिस्टीमवर सांस्कृतिक नृत्य करताना मिळून आलेले आहे.
उपविभागीय अधिकारी कळंब यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी व तपासणी करून चौकशी अहवाल 12 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी यांना सादर केला त्यानुसार कलाकेंद्रात अनेक नियमांचा भंग व त्रुटी असल्याचे नमुद केले. कला केंद्राच्या इमारतीचे बांधकाम परवानाबाबत कोणतेही कागदपत्र दिसून आलेले नाहीत. प्रत्यक्ष पाहणीत सदर ठिकाणी अंदाजे 50 आर क्षेत्रावर कला केंद्राचे बांधकाम दिसून आले. प्रवेश व बाहेर पडण्यासाठी दोन स्वतंत्र मार्ग नाहीत. नियमानुसार रंगमंच उभारलेला नसून रंगमंचावर कोणतीही व्यवस्था दिसुन आली नाही. प्रेक्षकांसाठी बसण्याची व्यवस्था नाही.
10 वातानुकूलित खोल्या नृत्य सादरीकरणासाठी उपलब्ध ठेवल्या आहेत. यात खोलीत कला सादर करीत असल्याचे तिथल्या कलाकरानी सांगितले. छापील तिकीट, जीएसटी नाही. कलाकेंद्रातील कलाकार व इतर व्यक्तींची नावे, वय, पुर्ण पत्ते इ. बाबतची माहिती संबंधीत पोलीस स्टेशनला दिली असल्याचे तोंडी सांगीतले मात्र कागदपत्रे दिली नाहीत.
सांस्कृतिक कार्यक्रमासाठी कोणतीही छापील तिकीटे दिली जात नाहीत. कला केंद्राच्या भिंतीला लागूनच बियर बार व हॉटेल लॉजिंग सुरु आहे.ग्रामसभेमध्ये पारित झालेला ठराव सादर केला नसल्याचे दिसून येते. या ठरावासोबत मासिक सभेस उपस्थित असलेल्या ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या दिसून येत नाहीत, यासह अन्य बाबी नमुद केल्या आहेत.












