धाराशिव – समय सारथी
2006 साली राज्यभर गाजलेल्या कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी दुहेरी हत्याकांडाचा निकाल 14 मे रोजी जाहीर होणार आहे, तब्बल 20 वर्षानंतर हत्यारा कोण ? याचा फैसला होणार आहे. या हत्याकांडातील माफीचा साक्षीदार पारसमल जैनला 14 वर्षांनी व शुटर दिनेश तिवारी आणि पिंटू सिंग या 2 आरोपींना तब्बल 16 वर्षानंतर तर डॉ पाटील यांना साडे 3 महिन्यात जामीन मिळाला होता. सर्व आरोपी जामिनावर बाहेर असुन 14 मे रोजी त्यांना कोर्टात निकालासाठी हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत, त्या दिवशी कोर्ट आपला निर्णय जाहीर करू शकते.
तेरणा ट्रस्ट, तेरणा कारखाना, 2004 ची विधानसभा निवडणुक यासह अन्य कळीचे मुद्दे ठरले. दरम्यान मागील सुनावणीला गैरहजर असलेल्या कैलाश यादव व गजेंद्र उर्फ धिरेंद्र उर्फ छोटे पांडे या 2 आरोपी विरोधात कोर्टाने अजामीन पात्र अटक वॉरंट कोर्टाने रद्द केले असुन त्यांना 14 मे रोजी हजर राहण्याची तंबी दिली आहे. मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी सुरु आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जन यात आरोपी असुन निकालाकडे लक्ष लागले आहे. पारसमल जैन बादला हा माफीचा साक्षीदार असुन त्याच्या जबाब भोवती हे संपुर्ण प्रकरण आहे. 20 एप्रिलच्या सुनावणीवेळी डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 7 आरोपी हजर होते तर 2 आरोपी गैरहजर होते त्यावरून कोर्टाने कडक शब्दात ताशेरे ओढत अटक वॉरंट काढले होते मात्र नंतर रद्द केले.
पवनराजे यांची हत्या करण्यासाठी पारसमलने फेब्रुवारी 2005 मध्ये लातुर येथे जाऊन त्यांच्या घरी रेकी केली त्यानंतर तो धाराशिवला आला मात्र डाव फसल्याने तब्बल 16 महिने कट रचून, पाळत ठेवून 3 जुन 2006 रोजी पवनराजे निंबाळकर यांची कळंबोली येथे भरदिवसा गोळ्या घालुन हत्या करण्यात आली. हत्याकांड नंतर 3 वर्षांनी 6 जुन 2009 रोजी माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांना खासदार पदावर असताना सीबीआयने अटक केली. महाराष्ट्र पोलिस, सीआयडी व त्यानंतर सीबीआय अश्या 3 तपास यंत्रणानी याचा तपास केला असुन सुनावणी दरम्यान ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह 128 साक्षीदार तपासण्यात आले.
राजकीय कारकीर्द व अस्तित्वाला धोका निर्माण झाल्याने माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे व मोहन शुक्ला यांनी कट रचत 25 लाख रुपयांची सुपारी देऊन हत्या केल्याचा ठपका सीबीआयने दोषारोपपत्रात ठेवला आहे. माजी गृहमंत्री तथा माजी खासदार डॉ पद्मसिंह पाटील, पारसमल जैन बादला, शुटर दिनेश तिवारी, मुंबईतील नगरसेवक मोहन शुक्ला, लातुर येथील सतीश मंदाडे, शुटर पिंटू सिंग, उत्तर प्रदेशमधील बसपा पक्षाचा नेता कैलास यादव, माजी उत्पादन शुल्क निरीक्षक शशिकांत कुलकर्णी व छोटे पांडे हे 9 जण दुहेरी हत्याकांडात संशयित आरोपी आहेत.
सीबीआयचे तत्कालीन वरिष्ठ अधिकारी ऋषीराज सिंग, पोलीस अधीक्षक तथा आयपीएस अधिकारी अमिताभ ठाकुर व त्यांच्या टीमची भुमिका महत्वाची राहिली. पवनराजे यांच्या पत्नी आनंदीदेवी राजेनिंबाळकर यांच्या वतीने ऍड पी एम गवाड हे तर डॉ पाटील यांच्या वतीने ऍड भुषण महाडिक, ऍड रोहित मालपाणी हे तर इतरांच्या वतीने ऍड नेहा सुळे बाजु मांडत आहेत.











