धाराशिव – समय सारथी
समोर सत्ता आणि पैसा आहे तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. निष्ठा असूनही जर लोकांची कामे करता येत नसतील, तर लोकांसमोर जायचे कसे? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार? त्यामुळे आता दुसरा पर्यायच उरत नाही, भावनिकदृष्ट्या विचार केल्यास पक्ष सोडण्याचा निर्णय हा चुकीचा वाटतो पण राजकीयदृष्या विचार केल्यास तो बरोबर आहे अशी प्रतिक्रिया खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दिली.
कै पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांडाचा 20 जुनला निकाल लागल्यानंतर ते भुमिका व निर्णय जाहीर करणार आहेत. मी सध्या मोठ्या धर्मसंकटात आहे. पैसे घेतल्याची चर्चा खोटी आणि तथ्यहीन आहे. सत्ता आणि पैसा नेहमीच गौण राहिले आहेत. हा निर्णय पैशांसाठी नव्हे तर मतदारसंघातील विकासकामे व अपेक्षेने पाहणाऱ्या मतदारांसाठी घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे इतके आमदार निवडून आलेले असतानाही ते शांत बसलेले नाहीत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. विधान परिषदेच्या निवडणुकीतही ते स्वतः फिरत आहेत. दुसरीकडे, प्रकृती अस्वास्थ्यामुळे उद्धव ठाकरे यांना फिरणे शक्य नाही हे मी समजू शकतो, पण किमान आदित्य ठाकरे यांनी फिरायला हवे होते. कार्यकत्यांना ताकद दिली पाहिजे होती, पण दुर्दैवाने ते झाले नाही.
खासदार म्हणून लोकांची कामे करण्यासाठी आपण इतके प्रयत्न करतो तरीही नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत आपली सत्ता का येत नाही ? हा विचार पडल्याशिवाय राहत नाही. जर आज हीच स्थिती राहिली, तर भविष्यात माझ्या राजकीय अस्तित्वालाही धोका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. अशा वेळी लोकप्रतिनिधी म्हणून मी काय करावे ? असा प्रतिप्रश्न केला.
लोकांना शेतरस्ते हवे आहेत, पूल हवे आहेत. गावात डीपी बसवण्यासाठी मी स्वतः तीन-तीन वेळा प्रस्ताव देऊनही कामे होत नाहीत. आमच्याकडे ना निधी असतो, ना काम करता येते. समोर सत्ता आणि पैसा आहे, तर माझ्याकडे फक्त निष्ठा आहे. प्रत्येकासोबत फोनवर बोलत आहे. मला कुठल्याही वाय प्लस किंवा अन्य सुरक्षेची गरज नाही असेही ते म्हणाले.











