‘मातोश्री’ व ‘ठाकरे’ परिवाराशी एकनिष्ठ – संघर्ष करून सामान्यांचा आवाज बनणार, आमदार कैलास पाटील
धाराशिव – समय सारथी
निष्ठा बोलून नव्हे तर कृतीतुन दाखवायची असते, काही झाले कोणी कुठेही गेले तरी उद्धव ठाकरे व शिवसेनेची साथ सोडणार नाही व शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडणार नाही असे वचन आमदार कैलास पाटील यांनी भर सभेत दिले. ‘मातोश्री’ व ‘ठाकरे’ परिवाराशी एकनिष्ठ राहणार असुन आगामी काळात संघर्ष करून सामान्यांचा आवाज बनणार असल्याचेही ते म्हणाले.
धाराशिव जिल्ह्यातील जनता, शिवसैनिक हा मातोश्रीशी एकनिष्ठ असणारी आहे. कुणी आले आणि गेले काही फरक पडत नाही शिवसैनिक खंबीर आहे जागेवर आहे. पाऊस असतानाही इतका मोठा समुदाय आला, आगामी काळात शेतकऱ्यांसाठी मोठे आंदोलन घेणार असुन त्यासाठी उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे यांनी आवर्जून यावे असे म्हणत शेतकऱ्यांसाठी जनआंदोलन उभारण्याचा संकल्प आमदार कैलास पाटील यांनी केला.
निष्ठा ही बोलून दाखवायची नसते तर ती कृतीतून दाखवायची असते. 2022 ला मला विरोधकांची मोठी ऑफर आली होती, ती मी धुडकावून लावली. मी त्यावेळी ही दाखवले, आताही दाखवून देत आहे. तमाम धाराशिवकरासमोर सांगतो की, काही झाले तरी मी ठाकरेंची साथ सोडणार नाही, शिवसैनिकांना शब्द देतो की मी तुम्हाला वाऱ्यावर सोडणार नाही.
माझ्या सारख्या शेतकरी कुटुंबातील मुलाला तुम्ही दोनदा आमदार केले, हे उपकार मी कायम विसरणार नाही, मी कायम सोबत असेल असे सांगत इथल्या लोकांची व माझी व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठवायची, संघर्ष करायची तयारी आहे. सर्वसामान्य जनता व शिवसैनिक यांचा आवाज बनुन काम करण्याची माझी तयारी आहे, असे ते म्हणाले.












