धाराशिव – समय सारथी
वीजचोरी व इतर कारवाई प्रकरणात गंभीर चुका केल्या प्रकरणी महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय आडे यांचे निलंबन करण्यात आले असुन छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय औंधेकर यांनी हे आदेश दिले. धाराशिव महावितरण मंडळातील वाढती वीजहानी, प्रलंबित ग्राहक पडताळणी, वीज चोरीवरील अपुरी कारवाई आणि वरिष्ठांच्या सूचनांकडे झालेल्या दुर्लक्षाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. आडे हे ऑक्टोबर 24 पासून धाराशिव मंडळाचे अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते.
महावितरणच्या आढाव्यात धाराशिव मंडळाची कामगिरी समाधानकारक नसल्याचे समोर आले. आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये 19.78 टक्के असलेली वीजहानी 2026-27 च्या पहिल्या तिमाहीत तब्बल 30.37 टक्क्यांवर पोहोचली. स्मार्ट मीटरनंतर थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांपैकी 17 हजार 398 ग्राहकांची पडताळणी प्रलंबित असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आले. 2 हजार 400 वीजचोरी प्रकरणे पकडण्याचे उद्दिष्ट असताना एप्रिल ते जुलैदरम्यान केवळ 369 आणि ऑगस्टमध्ये 40 प्रकरणे आढळली.
पडताळणीत 1 हजार 150 ग्राहकांकडे अनधिकृत वीजवापर अथवा वीजचोरी आढळली. मात्र त्यापैकी केवळ 58 प्रकरणांत कलम 135 आणि तीन प्रकरणांत कलम 126 अंतर्गत कारवाई झाली. एकाही प्रकरणात गुन्हा दाखल नसल्याची गंभीर बाब निलंबन आदेशात नमूद आहे. 5 हजार रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या नॉन-स्मार्ट मीटर ग्राहकांवरही अपेक्षित कारवाई झाली नसल्याचे स्पष्ट झाले. 34 हजार 216 ग्राहकांच्या यादीपैकी केवळ 10 हजार 321 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला, तर 27 हजार 196 ग्राहकांचा वीजपुरवठा थकबाकी असतानाही सुरू असल्याचे प्रशासनाने नमूद केले.
पॉवर ट्रान्सफॉर्मर बिघाडातही वाढ झाली. एप्रिल ते ऑगस्ट 2025 मध्ये चार ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाले होते; तर याच कालावधीत 2026 मध्ये 24 ऑगस्टपर्यंत सहा ट्रान्सफॉर्मर बिघडले. या सर्व बाबी कंपनीच्या कामकाजाच्या आणि हिताच्या दृष्टीने गंभीर असल्याचे नमूद करत संजय आडे यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबन काळात त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य अभियंता कार्यालयात दर सोमवार व शुक्रवार सकाळी 10 वाजता हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गतवर्षाच्या तलनेत पॉवर ट्रान्सफॉर्मर नाद्रुस्त होण्याचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले असन डीटीसी नादरुस्त होण्याचे प्रमाणही 5.74 टक्क्यांवर पोहोचले आहे. केवळ 6 हजार 804 ग्राहकांनाच स्मार्ट मीटर लावण्यात आले. औद्योगिक आणि ईएचव्ही फीडरवरील टिपिंगचे प्रमाण माठ्या प्रमाणावर वाढल्याने स्धारणा करण्याचे निर्दे्ञ दिले होते; मात्र त्यात कोणतीही प्रगती झाली नाही. या सर्व गैरकृत्यांमुळे महावितरण कर्मचारी सेवाविनियम 25 मधील नियम 88 (क) अन्वये संजय आडे यांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे









