धाराशिव / कळंब – समय सारथी
कळंब येथील ड्रग्ज तस्करीत आतापर्यंतच्या तपासात 4 आरोपी निष्पन्न झाले असुन एकामागून एक आरोपीची नावे समोर येत आहेत. शिवसेना उबाठा गटाचा नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा याला परभणी पोलिसांनी तपासाअंती अटक केल्यानंतर पोलिस कोठडी सुनावली आहे. मिर्झा याला परभणी पोलिसांनी सापळा रचून जामखेड येथील एका कला केंद्रातुन अटक केली आहे. मिर्झाचे ड्रग्ज सेवन ते तस्करी असा सहभाग असल्याची पोलिस सुत्रांची माहिती आहे. लातुर, धाराशिव जिल्ह्यात याचा सहभाग आहे का ? याचा तपास सुरु आहे.
मिर्झा गँगचे कळंब येथे सुद्धा कनेक्शन असुन त्या दृष्टीने तपास सुरु आहे. सीडीआर व इतर पुराव्याच्या आधारे पोलिस तपास करीत असुन लवकरच काही धक्कादायक बाबी समोर येणार आहेत. कळंब ड्रग्ज तस्करीत 4 पैकी 3 जणांना अटक केली असुन 1 जणांची रिमांड पुणे पोलिसांना मागितली आहे. मिर्झा हा शिवसेना उबाठा गटाचा नगरसेवक असुन ड्रग्ज तस्करीत अटक झाल्यानंतर सुद्धा पक्षाने कोणतीही भुमिका स्पष्ट व कारवाई केली नाही, हे विशेष. पक्षांतर घडामोडीनंतर शिंदे की ठाकरे गट हा कळीचा मुद्दा आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कळंब येथील स्तिथी अत्यंत बिकट बनली असुन इथे मोठ्या प्रमाणात ड्रग्ज विकले जात आहे, व्यसनाधीनतेचे प्रमाण अधिक आहे. शेजारील बीड, केज, परभणी, पुणे या भागापर्यंत हे सिंडीकेट पसरले असुन त्याला स्थानिक नेत्यांचे ‘पाठबळ’ व ‘राजाश्रय’ आहे. तुळजापूर प्रमाणे स्थानिकचे अनेक दिग्गज यात गुंतले असुन व्यसनाच्या आहरी गेले आहेत तर काहीचा विक्रीत सहभाग आहे.
धाराशिव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने कळंब शहरात मोठी कारवाई करीत निखिल युवराज जाधव व अरविंद दादाराव कांबळे या 2 आरोपीना अटक केली होती, त्यांच्याकडुन 11.21 ग्रामच्या वजनाच्या 29 पुड्या एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्या. त्यानंतर लखन गायकवाड या आरोपीला अटक केली असुन पिंपरी चिंचवड येथील एक आरोपी निष्पन्न झाला आहे तर आणखी काही जण रडारवर आहेत. पोलिस निरीक्षक शकील शेख हे तपास करीत आहेत.
परभणी पोलिसांनी पोलीस अधीक्षक पंकज कुमावत आणि अपर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई केली. पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या नेतृत्वाखाली ड्रग्ज तस्करी करणाऱ्या आंतर जिल्हा टोळीचा पर्दाफाश केला. सुरुवातीला अलीम शेख खाजा ( रा पाथरी, ) व शाहरुख फिरोजखान पठाण ( अंबाजोगाई बीड ) या 2 आरोपीना 14 लाख 63 हजार रुपयांच्या 72 ग्राम ड्रग्जसह 27 जुलै रोजी रंगेहात अटक केली.
मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 365/2026 दाखल करून तपास करून 7 ऑगस्ट रोजी आणखी 6 आरोपीना अटक केली. त्यात कळंबचा नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा (रा. कळंब, जि. धाराशिव), अकीब अक्रम मोमीन (रा. बीड), बाबा मोमीन रफीक (रा. लातूर), सय्यद समीर सय्यद शब्बीर (रा. परळी वैजनाथ, जि. बीड), शेख सलमान शेख इरफान (रा. काकर मोहल्ला, परळी वैजनाथ) आणि अयान नासेर पठाण (रा. बरकत नगर, परळी वैजनाथ) यांचा समावेश आहे. या सर्वाना 8 ऑगस्टला कोर्टाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक दर्शन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अनिल खिल्लारे तपास करीत आहेत.











