मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची चळवळ – 20 हजार महिला सक्षम, कोट्यावधीची उलाढाल
परंडा – समय सारथी
महिलांची आर्थिक व सामाजिक प्रगती व्हावी यासाठी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी महिला सबलीकरण व सक्षमीकरणावर भर देत चळवळ निर्माण केली आहे. क्रांती महिला उद्योग समुहाची स्थापना करुन त्या माध्यमातून जवळपास 20 हजार महिलांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे, या महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन घरबसल्या काम मिळत असुन त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत आहे. या उद्योग समूहामुळे एक महिला साधारणपणे आठवड्याला 2 हजार तर महिन्याला 7 ते 8 हजार रुपयांचे उत्पन्न मिळवत आहे. ग्रामीण भागातील महिलांना यामुळे मोठा आधार मिळत असुन आर्थिक प्रगती होत आहे.
महिला घर सांभाळतात, त्यांच्याकडे उपजत नियोजन व नेतृत्व कौशल्य असते. अगदी कमी पैसे असले तरी त्या योग्य नियोजन, खर्च, गरजेच्या बाबी व इतर गोष्टी पाहतात व यशस्वी संसार करीत कुटुंबाचा गाडा चालवीतात, हीच बाब ओळखून मंत्री सावंत यांनी महीलांना व्यवसाय व रोजगार क्षेत्रात आणले. घरगुती वापराच्या वस्तू, खाद्यपदार्थ, दैनंदिन वस्तूंची निर्मिती व विक्रीच्या माध्यमातून या महिलांना रोजगार व त्यातून आर्थिक फायदा होत आहे. काही विधवा, दिव्यांग व निराधार महिलांना यामुळे जगण्याची नवीन संधी मिळाली आहे.
पुर्वीपासुन चालत आलेल्या चालीरीती, रूढी, परंपरामुळे महिलांना आर्थिक, सामाजिकसह अनेक संकटांना सामोरे जावे लागत असते परंतु गेल्या काही वर्षांपासून मंत्री सावंत यांनी महिला सबलीकरण, सक्षमीकरणावर भर दिल्याने महिला आर्थिक दृष्ट्या प्रगत झाल्या आहेत. स्त्री व पुरुष समानता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने ही चळवळ खऱ्या अर्थाने महत्वाची ठरली आहे. चुल आणि मूल ही संकल्पना नष्ट करून या भागातील महिला खऱ्या अर्थाने सबळ झाल्या आहेत. स्वतःचे कुटूंब, समाजाला पुढे नेऊन त्यांनी स्वतःची सक्षमता सिद्ध करू दाखवली आहे त्याचे श्रेय पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी सुरु केलेल्या महिला सक्षमीकरण चळवळीला जाते.
केवळ रोजगार निर्मितीवर न थांबता या महिलांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी मंत्री सावंत यांनी प्रयत्न केले आहेत. स्थानिक बाजारपेठ सोबत मोठ्या शहरात असलेल्या संस्था यांच्याशी बातचीत करुन त्यांना संधी दिली आहे. मुलगी शिकली, प्रगती झाली त्याप्रमाणे महिला आर्थिक कमावती झाली, घराची स्तिथी सुधारली हे चित्र या भागात पहायला मिळत आहे. सावंत यांनी अनेक महिला बचत गटांना कच्चा माल व साहित्य खरेदीसाठी आर्थिक मदत सुद्धा केली आहे. शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अर्चना दराडे यांच्या नेतृत्वात महिला बचत गटाचे काम जोरदार सुरु असुन गावोगावी जाळे पसरले आहे.
महिला उद्योजक तयार करण्याचे स्वप्न – एमआयडीसीत संधी मिळणार
आगामी काळात महीलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा यासाठी नवनवीन उद्योग या भागात आणण्याचा व महिला उद्योजक उभे करण्याचा पालकमंत्री डॉ सावंत यांचा मानस आहे. रोजगार निर्मिती सोबतच होतकरू महिला उद्योजक तयार करण्यात येणार असुन त्यांना एमआयडीसी भागात जागा व आर्थिक मदत देऊन स्थानीक महिला उद्योजक यांना संधी दिली जाणार आहे. भुम परंडा वाशी हा भाग तसा डोंगराळ असुन या भागात शेतीला जोडधंदा म्हणुन दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो त्यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणात याला चालना मिळावी यासाठी भुम येथे दुधसंघ सुरु करण्याचा मंत्री डॉ सावंत यांचा मानस आहे.