चौकशीचे आदेश, कार्यवाही सुरु – आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मांडला मुद्दा
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करीचा मुद्दा हिवाळी विधिमंडळ अधिवेशनात चांगलाच गाजला आहे. ड्रग्ज प्रकरणात तुळजापूरची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात असुन याची चौकशी करून कार्यवाही करावी अशी मागणी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी विधिमंडळ सभागृहात लक्षवेधी सुचना दरम्यान केली. तुळजाभवानी देवीच्या महंतांनी मुख्यमंत्री यांच्याकडे लेखी तक्रार केली असुन त्या तक्रारीचा आधार आमदार पाटील यांनी घेत लक्षवेधी सुचना मांडली.
तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरु असुन कार्यवाही करण्याचे आश्वासन विधिमंडळात देण्यात आले. महंत यांनी दिलेल्या तक्रारीवर मुख्यमंत्री यांनी 12 सप्टेंबर चौकशीचे आदेश दिले आहेत.
शनिवारी आमदार कैलास पाटील यांनी अधिवेशनात अंतीम आठवडा प्रस्तावात ड्रग्जचा मुद्दा मांडला त्यात त्यांनी मुख्यमंत्री ड्रग्ज बाबत झिरो टॉलरन्स म्हणतात मात्र तुळजापूर येथे तसे होत नाही. लक्षवेधीचे उत्तर सभागृहात येण्या अगोदर सोशल मीडियावर लीक झाले त्यात कारवाई केली नाही, अतुल अग्रवाल याचे नाव आरोपींच्या जबाबात येऊनही तो मोकाट आहे. तपास व वस्तुस्थितीची बातमी लिहणाऱ्याला प्रसार माध्यमावर दबाव आणला जातो असे मुद्दे त्यांनी सभागृहात मांडले.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या विकासासाठी महायुती सरकारकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत. वैश्विक दर्जाचे धार्मिक क्षेत्र तयार होत आहे. तीर्थक्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यासह रेल्वेच्या कामासाठी देखील सरकारने मोठा निधी उपलब्ध करून दिला असून या माध्यमातून येत्या काळात तुळजापूरचा कायापालट होणार आहे. मात्र काही विरोधकांकडून एकत्र येऊन षडयंत्र रचून तुळजापूरची बदनामी सुरू आहे असा गंभीर आरोप आमदार पाटील यांनी केला.
तुळजापूर ड्रग्स प्रकरणी काही माहिती आपल्याला मिळाली होती. त्यानंतर तात्काळ संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या कानावर आपण ती माहिती घातली आणि त्यानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली. मात्र या प्रकरणाचा आधार घेऊन काही जणांकडून जाणीवपूर्वक तुळजापूरच्या बदनामीचे प्रयत्न केले जात आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तुळजापूरच्या मुख्य महंतांनी तक्रार देखील केली होती विधानसभेमध्ये याप्रकरणी लक्षवेधी मांडून आपल्या तुळजापूरची षडयंत्र रचून नाहक बदनामी केली जात असल्याप्रकरणी उच्चस्तरीय समिती गठीत करून चौकशी करावी त्या समितीला कार्यकाळ द्यावा अशी मागणी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केली.
आमदार पाटील यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने सभागृहात उत्तर देण्यात आले. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 38 आरोपी निष्पन्न झाले असुन 47 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी 14 आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र न्यायालयात पाठवले असुन 38 पैकी 30 आरोपीना अटक केली आहे. 27 आरोपी जामीनावर आहेत तर 3 न्यायालयीन कोठडीत आहेत. तक्रारीच्या अनुषंगाने धाराशिव पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत सद्यस्तिथीत चौकशी सुरु असुन चौकशी अंती प्रस्तुत प्रकरणी योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे उत्तर देण्यात आले. राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी उत्तर दिले.












