परंडा – समय सारथी
राष्ट्रवादी शरद पवार पार्टीचे अध्यक्ष शरद पवार हे 10 नोव्हेंबर रोजी रविवारी परंडा येथे सकाळी 10 वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत. जागा वाटपात भुम परंडा वाशी ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरद पवार गटाला सुटली आहे. शिवसेना उबाठा गटाचे पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाचा एबी फॉर्म देत माजी आमदार कै ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र रणजित पाटील यांना उमेदवारी दिली होती, त्यांनी अर्जही भरला मात्र उमेदवारी वापस घेण्याच्या शेवटच्या क्षणि रणजित पाटील यांनी मातोश्रीचा आदेश पाळत माघार घेतली. सध्या पाटील यांचा गट सक्रीय नसुन शांत आहे.
भुम परंडा वाशी येथे राष्ट्रवादीचे राहुल मोटे विरुद्ध डॉ तानाजीराव सावंत यांच्यात परंपरागत लढत होत होत आहे. 2019 साली राहुल मोटे व मंत्री तानाजीराव सावंत यांच्यात लढत झाली होती. 2019 साली सत्ता आल्यावर सुरुवातीच्या काळात डॉ तानाजीराव सावंत यांना मंत्रीपद केवळ शरद पवार यांच्या राजकीय हस्तक्षेप मुळे मिळाले नव्हते. शरद पवार यांनी त्यावेळी सावंत यांना मंत्रीपद देण्यास विरोध केला. त्याचा वाचपा मंत्री डॉ सावंत यांनी काढला व शिवसेनेत उठाव करुन राज्यात सत्ता परिवर्तन करुन दाखविले.
इथे निवडणुकीच्या रिंगणात उबाठा नाही, मशाल पण नाही इथे तुतारी आहे. शिवसेना आमची म्हणनाऱ्यांनी मशाल विकून टाकली व मतदार संघ पण देऊन टाकला. क्रांतीची मशाल नसुन घराघरात आग लावणारी, पेटवणारी, द्वेष व तेढ निर्माण करणारी मशाल आहे त्यामुळे ती विझवून टाका, हवा इकडे तेज आहे मशाल राहत नाही, तुतारी वाजत नाही. अंगात नाही बळ चिमटा काढुन पळ, तानाजीरावासमोर आपली डाळ शिजत नाही, पडायची भीती वाटत होती म्हणुन दुसरा उमेदवार दिला अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज परंडा येथे केली. मुख्यमंत्री यांच्या टिकेनंतर शिवसेना उबाठा गट कसा प्रतिसाद देतो व शरद पवार परंडा येथील सभेत काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे.
भुम परंडा वाशी मतदार संघात 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. राहुल मोटे हे 2004, 2009, 2014 असे सलग 3 टर्म आमदार होते तर त्यांचे वडील महारुद्र बप्पा मोटे हे 1985 व 1990 असे 2 टर्म आमदार होते. इथे त्यांची 2024 मध्ये आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या विरोधात लढत होत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत परंडा मतदार संघात पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे विक्रमी 32 हजार 902 मतांनी विजयी झाले होते त्यांनी सलग 3 टर्म आमदार राहिलेल्या राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांचा पराभव केला होता. मोटे यांना 73 हजार 772 मते पडली होती तर सावंत यांना 1 लाख 6 हजार 674 मते पडली होती.