मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर पेट्रोल, अंडी, दगड टाकून जीवघेणा हल्ला, जिवंत जाळण्याचा प्रयत्न
धाराशिव – समय सारथी
पवनचक्कीच्या वादातुन मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचा निर्घृण खुन करण्यात आला. पवनचक्की माफिया यांच्या टार्गेटवर सरपंच असल्याचे अनेक घटनात समोर आले आहे. धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील फक्राबादचे सरपंच नितीन बिक्कड यांच्यावर गोळीबार झाला होता व त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. गोळीबार व धमकी या दोन्ही घटनात त्यांनी पवनचक्की व माफिया सहभागी असल्याचा आरोप केला होता, त्याचा तपास होणे गरजेचे आहे. तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा येथील सरपंच नामदेव निकम यांच्यावर पेट्रोल, अंडी, दगड टाकून जीवघेणा हल्ला करण्यात आला त्याप्रकरणी 4 अज्ञात आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्यातही सरपंच कदम यांनी पवनचक्की वादाचा उल्लेख केला आहे.
पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती बैठकीत ज्ञानेश्वर गीते यांनी सरपंच बिक्कड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करीत निषेध केला व पवनचक्की प्रकल्प बंद करण्याची मागणी केली.
बिक्कड यांच्या गाडीवर 17 जून 2022 रोजी पारा -फक्राबाद रोडवर रात्री 9 वाजता अज्ञात 2 व्यक्तीकडून गोळीबार करीत हल्ला करण्यात आल्याची घटना घडली होती त्या प्रकरणी वाशी पोलिसात कलम 307,341,427 सह शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद आहे. बिक्कड यांच्या गाडीवर 2 गोळ्या झाडण्यात आल्या असून त्यातील एक गोळी ही गाडीच्या समोरच्या काचावर मध्यभागी लागली आहे तर एक गोळी ड्राइवर साईडच्या बाजूला लागली. या गुन्ह्याचा तपास सुरु आहे.गोळीबाराचा हा प्रकार दिल्ली येथील रेन्यू सूर्या रोशनी कंपनीच्या पवनचक्की टेंडरवरून झाला असल्याचा पुरवणी जबाब बिक्कड यांनी दिला होता. कंपनीचे के राजा कुमार व कंपनीचा वेंडर कुलदीप देशमुख यांनी घडवून आणला असावा असा संशय बिक्कड यांनी जबाबात व्यक्त केला होता.
तुळजापूर तालुक्याच्या बारुळ गावामध्ये सचिन ठोंबरे या शेतकऱ्याला पवनचक्कीच्या गुत्तेदार आणि गुंडाकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. मारहाण करणारे आरोपी दादा पवार, अंकित मिश्रा, वैभव कदम व इतर सात जणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजापूर तालुक्यात रिन्यू कंपनीकडून पवनचक्की उभारणीचे काम सुरू असून, त्याचा मुख्य ठेकेदार रजा मुराद याने अमोल लाखे पाटील यास ठेका दिला आहे. अमोल लाखे पाटील हा या भागात गुंडगिरी करीत असल्याचे बोलले जात आहे, लाखे याचा निलेश घायवळ सोबतचे फोटो व्हायरल झाले आहेत.
अंकुश बिक्कड यांनी पोलिस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात असे म्हण्टले आहे की, माझा मुलगा नितीन बिक्कड हा वाशी तालुक्यातील फक्राबाद गावचा सरपंच आहे तसेच तो राष्ट्रवादी काँग्रेसे पक्षाचा शरदचंद्र पवार गटाचा युवक प्रदेश उपाध्यक्ष आहे. 5 जुलै रोजी 3 ते 4 सुमारास मी आमच्या गावातुन फक्राबाद ते पालसिंगण रस्त्याने जात होता तेव्हा निलेश घायवाळ व त्याचे सोबत 4 फोरविल्हर गाडया ज्याचा कमांक 8055 असा होता त्या गाडया माझेजवळ थांबल्या व त्या गाडीतील एक व्यक्तीने माला त्याचे नाव निलेश घायवाळ आहे असे सांगितले व त्याने मला विचारले की, नितीन बिक्कड कोठे राहतो तेव्हा मी त्यांना म्हणलो की, काय काम आहे तो माझा मुलगा आहे. तेव्हा ते म्हणाले की, त्यास आम्ही सोडणार नाहीत तो फार माजलाय आम्ही त्यास जिवे मारणार आहोत त्यामुळेच आम्ही येथे आलो आहोत असे म्हणत होता. त्यांच्या जवळ बंदुका होत्या त्यांच्या पासुन माझ्या मुलाच्या जिवास धोका आहे. त्याच्या विरोधात योग्य ती कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी अंकुश बिक्कड यांनी केली आहे. त्यानंतर अज्ञात आरोपी विरोधात वाशी पोलिसात भारतीय न्याय संहिता कलम 351(2) व 351(3) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. या घटनेबाबत कोणताही तपास करण्यात आला नाही हे विशेष. या घटनेनंतर बिक्कड यांनी संरक्षण देण्याची मागणी केली आहे.