धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपी असलेल्या 2 माजी नगराध्यक्ष यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केल्यानंतर भाजप ड्रग्ज माफियाला राजाश्रय देतोय का अशी टीका होत असुन खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. त्या पत्रात त्यांनी अश्या बाबतीत नाराजी व्यक्त केली आहे.
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वर कदम उर्फ मेंबर व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या ‘कुशल’ नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश केला. हे दोघे भाजपकडुन नगर परिषद लढणार असल्याची माहिती आहे. आमदार राणा यांनी ड्रग्ज गुन्ह्यातील काही आरोपीना एकाच छताखाली आणत भाजप प्रवेश दिला असुन मानाचे स्थान दिले आहे.
छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने कणे व कदम यांच्यासह 9 जणांना निकाल लागेपर्यंत ‘धाराशिव तहसील’ प्रवेश बंदी केली आहे. घटना, पुरावे, साक्षीदार हे सगळे तुळजापूर येथील आहेत त्यामुळे पोलिस कोर्टात जाऊन ‘तुळजापूर’ बंदी करण्यासाठी ठोस भुमिका घेणार का ? हे पाहावे लागेल.

तुळजापूर शहरातील काही जणांना भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देण्यात आला. यामध्ये शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील आरोपींंचा देखील समावेश होता, अशी बातमी वाचनात आली. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि राणाजगजीतसिंह पाटील या जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेद आश्चर्य वाटले. यासोबतच ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली असे सुळे यांनी पत्रात म्हण्टले आहे.
लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक राजकीय पक्षाला आपली संघटना वाढविण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. परंतु त्याचवेळी कोणत्याही अनिष्ट, समाजविघातक प्रवृत्तीला थारा न देण्याची नैतिक जबाबदारी देखील सार्वजनिक आयुष्यात कार्यरत असणाऱ्या प्रत्येकावर असते, याबाबत आपणही सहमत असाल.
आपण राज्याचे प्रमुख आहात, आपल्यासमोर अनेक कामे पडलेली असतात. त्यामुळे कदाचित ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचली नसावी, किंवा सदर व्यक्तीच्या ड्रग्स गुन्हेगारीमधील पार्श्वभूमीबाबत आपल्याला माहिती देण्यात आली नसावी. हे गृहित धरुन मी आपणास हे पत्र लिहित आहे. समाजहित डोळ्यासमोर ठेवून ड्रग्जविरोधी लढ्यात आम्ही सर्वजण आपल्यासोबत आहोत. या संदर्भात मी यापूर्वीही आपणांस पत्राद्वारे कळविले होते.
तुळजापूरमधील या प्रकाराकडे आपण गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांविरुद्ध योग्य ती कारवाई कराल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. ड्रग्स तस्करीला या महाराष्ट्रात राजाश्रय दिला जाणार नाही अशा प्रकारचा सकारात्मक संदेश समाजात जाण्यासाठी आणि ड्रग्जविरोधी मोहिमेला बळकटी मिळावी यासाठी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे. याची आपण योग्य ती दखल अवश्य घ्याल की अपेक्षा त्यांनी पत्रातून व्यक्त केली आहे.
सोहळा – ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील 2 माजी नगराध्यक्ष भाजपात, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे यश ? टीकेसह समिश्र प्रतिक्रिया
दैनिक समय सारथी
व्हिडिओ –









