धाराशिव – समय सारथी
उमरगा लोहारा मतदार संघांचे शिवसेना उबाठा गटाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी ‘दावा’ केलेल्या त्या ‘राजशिष्टाचार’ व ‘हक्कभंग’ इशाऱ्याच्या पत्राबाबत संभ्रम वाढला आहे. ते पत्र मी पाहिले नाही, किंवा ई मेल वर आले नाही, खात्री करून सांगतो मात्र बातमी आल्यानंतर आमदार स्वामी यांच्याशी बोलणे झाले असुन राजशिष्टाचार पाळा अश्या सुचना उमरगा उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हक्कभंग प्रस्ताव सारख्या गंभीर विषयावर आमदार प्रवीण स्वामी यांची 2 पत्र सोशल मीडियावर समोर आली असुन त्या दोन्ही पत्रावरील स्वामी यांची सही वेगवेगळी आहे. त्याबाबत स्वामी यांनी मौन बाळगल्याने ‘गुपित’ वाढले आहे त्यातच जिल्हाधिकारी यांच्या उत्तरांनी ‘संभ्रम’ वाढवला असुन त्यात ‘भर’ टाकली आहे. ‘राजशिष्टाचार’ व थेट आयएएस दर्जाच्या अधिकारीवरील ‘हक्कभंग’ सारख्या गंभीर विषयात असे जिल्ह्यात पहिल्यांदा घडत आहे.
स्वामी यांनी 2024 ची विधानसभा निवडणुक लढवताना जे शपथपत्र दाखल केले त्यात सही वेगळी, सोशल मीडियावर समोर आलेल्या पहिले व दुसरे पत्रात सही वेगळी आहे. एकंदरीत स्वामी यांच्या अनेक सह्या असल्याने सर्व गुंता वाढला आहे. पत्र पाठवायचे नव्हे तर प्रसार माध्यमात देऊन दबाव कोणावर टाकायचा होता, दबाव तंत्रासाठी की कशासाठी? याची चर्चा रंगत आहे.
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय मदतीचे वितरण करण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला आमदार स्वामी यांना बोलावण्यात आले नाही, त्यावरून वाद सुरु झाला. राजशिष्टाचार भंग प्रकरणी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यावर 7 दिवसाच्या आत निलंबनाची कारवाई करावी अन्यथा त्या कार्यक्रमाला आपली मूक संमती होती असे मानून जिल्हाधिकारी यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात येईल असा इशारा स्वामी यांनी त्या पत्रात दिला होता.
स्वामी यांच्या पहिल्या पत्रात लोकसभेत हक्कभंग आणू असा उल्लेख आहे. स्वामी हे महाराष्ट्र विधानसभेतील आमदार मग ते लोकसभेत हक्कभंग कसा आणणार ? राजशिष्टाचारनुसार मला व आमदार प्रवीण स्वामी यांना कोणतीही पुर्व कल्पना न देता खासगी ठिकाणी मदत वाटप करण्यात आले असे त्या पत्रात नमुद आहे. स्वामी यांची 2 वेगवेगळी पत्र समोर आली असुन त्यात सही वेगळी आहे मात्र मजकूर एक सारखाच आहे.












