धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात कुणबी मराठा अश्या 459 नोंदी सापडल्या असुन जिल्हा प्रशासनाने तब्बल 40 लाख 49 हजार कागदपत्रे, दस्त व नोंदी यांची तपासणी केली. यात 407 नोंदी ह्या 1948 साला पूर्वीच्या असुन 1948 ते 1967 या काळात केवळ 52 नोंदी सापडल्या असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी दिली आहे.
मराठा कुणबी आरक्षण समितीचे अध्यक्ष न्यायमुर्ती संदीप शिंदे यांनी आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली त्यात जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी माहिती व पुरावे समितीकडे सादर केले.जिल्हा प्रशासनाने मागील महिन्यात संपूर्ण यंत्रणा कागदपत्रे तपासणीसाठी कामाला लावली होती त्यात महसूल, शिक्षण, मुद्रांक,पोलीस, कारागृह, भुमी अभिलेख यासह कर्मचारी यांच्या सेवा पुस्तिका तपासण्यात आल्या. सर्वाधिक कुणबी नोंदी ह्या शिक्षण विभागाकडे सापडल्या.
जिल्ह्यातील मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे अभिलेख शोधण्यासाठी 11 विभागातील 43 प्रकारच्या अभिलेखांची तपासणी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या वतीने वेगवेगळ्या विवरणपत्रात माहिती संकलित करून करण्यात आली. या विवरणपत्रात सादर केलेली माहिती 1948 ते 1967 पूर्वीच्या कालावधीतील अभिलेखे तपासणी करून तयार करण्यात आली आहे. या तपासणीमध्ये 1948 पूर्वीचे निजामकालीन महसुली भूमी अभिलेखे शैक्षणिक व जन्म व मृत्यू नोंद वहयांची तपासणी करून समितीपुढे अहवाल सादर करण्यात आला.