धाराशिव – समय सारथी
वर्ग 2 जमिनीच्या बाबतीत महाराष्ट्र सरकार लवकरच मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे, राज्य सरकार येत्या अधिवेशनात विधेयक आणुन कायदा दुरुस्ती करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे ज्यात नजराणा व दंडाची रक्कम कमी केली जाणार आहे. दंड भरून वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 करता येणार आहेत. नजराणा व दंडाची रक्कम कमी करण्याबाबत मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेऊन मंजुरीनंतर विधेयक आणुन कायद्यात दुरुस्ती केली जाऊ शकते. वतन, वकफ, सिलिंग, देवस्थान यासह शर्तभंग प्रकरणात दंडाच्या रकमेबाबत नवीन नियम केला जाऊ शकतो, ज्याचा फायदा राज्यातील जमीन मालकांना होणार आहे.
खिदमतमास जमिनी बाबतही सरकार सकारात्मक निर्णय घेऊ शकते, यासाठी आढावा बैठका अंतीम टप्प्यात आहेत. धाराशिव महसूल प्रशासनाने हजारो एकर जमिनीचा मालकी प्रकार वर्ग 1 वरून वर्ग 2 केला आहे मात्र आता त्यांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. धाराशिव येथील शेतकरी बचाव कृती समितीने याबाबत मोठे जनआंदोलन करीत पाठपुरावा केला होता. अध्यक्ष धनंजय शिंगाडे, मार्गदर्शक विश्वास शिंदे, उपाध्यक्ष राजाभाऊ बागल, सुभाष पवार, उमेश राजे निंबाळकर, मनोज राजे निंबाळकर हे लढा देत आहेत. पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत, आमदार कैलास पाटील हे याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत त्यामुळे त्यांचे शिंगाडे यांनी आभार मानले.
महाराष्ट्र शासनाच्या राजपत्राप्रमाणे धाराशिव जिल्ह्यातील 120 गावात वक्फ बोर्डाची 8 हजार 743 एकर जमीन आहे. ही जमीन विविध दर्गा, मशीद, कब्रस्थान यासह अन्य संस्थांना विविध सेवा करण्यासाठी (खिदमत व मदतमाश) मुतवल्ली, मशायक, इनामदार,मुजावर,हिस्सेदार यांना सेवेसाठी देण्यात आल्या आहेत. वकफ, देवस्थान यातील अनेक जमिनी विकुन टाकल्या असुन नागरी वस्ती झाली आहे.
धाराशिव शहरातील देवस्थान, वकफ, वतन, सिलिंग जमिनीच्या तब्बल 375 विविध सर्वे नंबर मधील 1 हजार 303 हेक्टर म्हणजे 3 हजार 220 एकर क्षेत्रावरील जमिनीच्या नोंदी वर्ग 2 मध्ये घेण्यात आल्या आहेत. या जमिनीत ज्यांना अकृषी आदेश देण्यात आले आहेत त्यांचे अकृषी आदेश देखील रद्द केले आहेत त्यामुळे जमिनीचे खरेदी विक्री व्यवहार, बँकेत कर्ज तारण व इतर व्यवहार ठप्प झाले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील 8 तालुक्यात 8 हजार 670 हेक्टर म्हणजे जवळपास 21 हजार 500 एकर पेक्षा अधिक जमीन इनामी आहे. यात सर्वाधिक जमीन धाराशिव तालुक्यात 3 हजार 94 हेक्टर आहे तर उमरगा तालुक्यात 913 हेक्टर, भूम तालुक्यात 392 हेक्टर, तुळजापूर तालुका 1 हजार 963, वाशी 148, लोहारा 361, परंडा तालुक्यात 1 हजार 439 हेक्टर तर कळंब तालुक्यात 356 हेक्टर जमीन अशी 8 हजार 670 हेक्टर जमीन विविध प्रकारच्या इनामाची आहे.
दंडात्मक रक्कम कमी होणार, असे असतील संभाव्य दर –
चालू बाजार मुल्याच्या 50% नजराणा रक्कम व अश्या रकमेच्या 50 टक्के म्हणजे 25 टक्के रक्कम दंड असे 75 टक्के भरणा केल्यास ज्या वर्ग 2 च्या जमिनीला वर्ग 1 करणे सध्याच्या नियमानुसार शक्य आहे मात्र ही रक्कम मोठी असल्याने ती भरणे सहज शक्य नाही. राज्य सरकार नजराणा व दंडाची रक्कम कमी करण्याचा विचार करीत असुन बाजार मुल्याच्या 5 टक्के नजराणा रक्कम व त्याच्या 50 टक्के दंड म्हणजे 2.5 टक्के असे 7.5 टक्के भरणा केल्यास वर्ग 2 ची जमीन वर्ग 1 करता येणार आहे.