धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील भुम येथील फय्याज पठाण यांच्या आत्महत्या प्रकरणातील आरोपी सुरेश उर्फ सूर्यकांत कांबळे यांनी गुन्हा रद्द ( FIR Quashing ) करावा यासाठी छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 7 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्यात आली असुन पुढील सुनावणी 10 डिसेंबर रोजी होणार आहे. कांबळे यांच्यावर 21 जुन 2023 रोजी गुन्हा नोंद झाला असुन ते सध्या फरार आहे. भुम पोलिसांना ते वॉन्टेड असुन त्यांचा शोध 2 पथकाकडुन सुरुच आहे. दरम्यान फिर्यादी सोबत तडजोड झाली आहे त्यामुळे गुन्हा रद्द करावा असा डावपेच कोर्टात मांडला आहे. फिर्यादीने तडजोड केली असली तरी धाराशिव पोलीस हे त्यांच्या तपासावर व भूमिकेवर ठाम आहेत ही जमेची बाजु आहे.
आत्महत्याच्या गुन्ह्यात कांबळे यांना अटकपुर्व जामीन देण्यासाठी कोणताही ठोस आधार वाटत नाही, त्यामुळे त्यांना दिलेला तात्पुरता जामीन रद्द करण्यात येतो व त्यांना भुम येथील कोर्टात शरण (सरेंडर) होण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाच्या 2 न्यायमुर्तीच्या खंडपीठाने दिले होते. न्यायमुर्ती एम एम सुंद्रेश व एसव्हीएन भट्टी यांनी हे आदेश दिले आहेत मात्र कांबळे हे शरण आले नाहीत त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा अवमान केला. उलट त्यांनी गुन्हा रद्द करावा यासाठी याचिका दाखल केली.
आत्महत्या प्रकरणात सुरेश कांबळे यांना तात्पुरता जामीन दिल्यानंतर केलेला जल्लोष, फेसबुक पोस्ट, दैनिक समय सारथी वृत्तपत्राने केलेली बातमी हे भुम पोलिसांनी सुप्रीम कोर्टात मांडले त्यानंतर जामीन रद्द केला. तत्कालीन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाली पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी सुप्रीम कोर्टात अहवाल दिला होता.
भुम येथील 30 वर्षीय फय्याज दाऊद पठाण या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात बार्शी येथील डॉ नंदकुमार स्वामी,अर्चना स्वामी,यश स्वामी व सुरेश कांबळे यांच्या मानसिक जाच व मारहाणीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगितल्याने कलम 306,323,504,506 व 34 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
साम,दाम,दंड भेद..सिंघम, सरकार राज अश्या गाण्याच्या सुचक संदेश देणाऱ्या रिल्स व जल्लोषाचे फोटो, व्हिडिओ स्वतः सुरेश कांबळे यांनी सोशल मीडियावर टाकल्या होत्या त्या चांगल्याच अंगलट आल्या. ना मंत्री,ना खासदार,ना आमदार,ना साखर कारखान्याचा वा बँकेचा चेअरमन हे तर जनतेचे प्रेम असे सांगत सुरेश भाऊ यांनी जल्लोषाचे फोटो, व्हिडिओ, रिल्स स्वतः पोस्ट केले होते.
आत्महत्या केल्यावर माझ्या कुटुंबाचे रक्षण करा. कांबळे सारखे गुंड जर म्हणत असतील पोलीस माझे काही करू शकत नाहीत तर मग तुम्ही पोलीस चौकीला मोठे कुलपे लावा. तुमची काही गरज नाही, माझा मृतदेह तेव्हाच कुटुंबाच्या ताब्यात द्या जेव्हा सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात जेलमध्ये असतील. माझ्या मृतदेहाला मुंग्या लागल्या तरी चालेल मात्र तो देऊ नका अशी कळकळीची विनंती विडिओमध्ये करीत फाय्याज यांनी आत्महत्या केली होती.