हाच का खरा चेहरा ? पार्टी विथ ‘माफिया’ – दादा ठरले आश्रयदाते – इच्छा, हट्ट की मजबुरी ?
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर नगर परिषद अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी भाजपने ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील संशयीत आरोपी विनोद उर्फ पिटू भाई गंगणे यांना उमेदवारी दिली आहे, त्यानंतर सर्वत्र टिकेची झोड उठत आहे. तुळजापूर नगर परिषद निवडणुकीत गंगणे हे भाजप पक्षाचा चेहरा असणार आहे. ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे नव्हे तर ‘पार्टी विथ माफिया’ अशी टीका या प्रकारानंतर होत आहे. एकटे गंगणे नव्हे तर इतरही काही मंडळीना भाजपात व इतर पक्षात ‘राजाश्रय’ मिळाला आहे.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात अजून धाराशिव पोलिसांचा तपास सुरु असुन 38 पैकी 2 आरोपी फरार आहेत, अंतीम दोषारोपपत्र कोर्टात दाखल केलेले नाही. फरार काळात मोहोळ पोलिसात गुन्हा नोंद असलेले गंगणे यांचे 2 ‘गहाळ’ मोबाईल शोध सुरु आहे. अश्या परिस्थितीत एखाद्या आरोपीला उमेदवारी देणे हे नैतिकतेच्या दृष्टीने कितपत योग्य आहे, असाही सवाल केला जात आहे. राजाश्रयाने यंत्रणावर दबाव येऊ शकतो. आमदारांची इच्छा नाही पण काही गुंड्या अडकल्याने ‘मजबुरी’ आहे असे सांगणारा एक गट आहे. देशात भाजपला पर्याय उभा करता आला मात्र तुळजापूरात होऊ दिला नाही असा दावा हा ‘गट’ अभिमानाने करतो. आम्हाला डावलून ‘सत्ता’ आणूनच दाखवा असे खुले चॅलेंज आहे.
मटका बुकी ते ड्रग्ज तस्करीतील आरोपी असा विनोद गंगणे यांचा प्रवास असुन त्यांच्या प्रत्येक टप्प्यावर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा राजकीय आशीर्वाद लाभला आहे. राष्ट्रवादी ते भाजप या प्रवासात राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सोबत गंगणे हे कायम राहिले आहेत, त्यामुळे दोघांनी पक्ष बदलला तरी ‘मन व सुत’ चांगलेच जुळलेले आहे. मध्यंतरी आमदारकीची स्वप्ने सोडता गंगणे यांनी कधीही राणा यांची साथ सोडली नाही किंवा तसा विचार केला नाही. मटका, नगर परिषद यात्रा अनुदान घोटाळा, ड्रग्ज तस्करी अश्या अनेक गुन्ह्यात गंगणे व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींचा सहभाग समोर आला आहे.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात फरार असताना विनोद गंगणे यांच्यासह त्यांच्या टीमची मटकाबुकी जोरात सुरु होती. विनोद विलास गंगणे यांच्यासह अमोल माधवराव कुतवळ, विक्रम नाईकवाडी, चैतन्य शिंदे, सचिन पाटील यांच्यासह तब्बल 33 जणांना पोलिसांनी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4 व 5 नुसार तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून आरोपी केले. मलबा हाईट्स येथे एका फ्लॅटमध्ये छापा मारल्यानंतर पोलिसांना 6 मोबाईल, 1 लॅपटॉप, प्रिंटर, 65 हिशोबाच्या नोंद वह्या सापडल्या आहेत. 20 सप्टेंबर 2021 पासूनच्या मटका, एजन्ट, कमिशन व इतर आर्थिक व्यवहाराच्या नोंदी या 65 कागदपत्रात आहेत.
तुळजापूर ड्रग्ज व राणाजगजीतसिंह पाटील हे आगळ वेगळं नातं आणि समीकरण बनलं असुन त्याचे अनेक रंजक किस्से आहेत. तुळजापूर येथे ड्रग्ज विक्री व सेवन केले जात असल्याची माहिती त्यांना काही महिलांनी दिली मात्र लोकसभा व विधानसभा निवडणुकामुळे जवळपास 1 वर्ष दुर्लक्ष केले व नंतर योग्य वेळी ‘त्या’ माहितीचा वापर केला. गंगणे यांना तेरणा मेडिकल कॉलेज नेरुळ, पुणे व नंतर बडोदा येथे व्यसनमुक्त करण्यात आमदार पाटील यांनी मार्गदर्शन लाभले. ड्रग्जकांडात राजकीय हस्तक्षेप व यंत्रणेचा वापर झाल्याचे वेळोवेळी अनेक घटनातुन समोर आले आहे. काही हजारांचा व्यवहार असलेला ‘तस्कर’ तर एकाच वेळी लाखोंचे ड्रग्ज खरेदी करणारा सेवन गटात असा प्रकार घडला आहे.
ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर उर्फ मेंबर व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे यांना त्यांनी प्रवेश देऊन राजश्रय दिला. आमदार राणा यांनी ड्रग्ज गुन्ह्यातील अनेक आरोपीना एकाच छताखाली आणत भाजप प्रवेश देऊन एक प्रकारे राजकीय व सामाजिक पुनर्वसन केले त्यामुळे त्यांच्यासाठी ते ‘आश्रयदाते’ ठरले आहेत. संतोष परमेश्वर यांनी विधानसभावेळी आमदार पाटील यांच्यावर टीका करून राजकीय वाट चुकले होते मात्र ड्रग्ज गुन्ह्यात ‘जेलवारी’ झाल्यानंतर त्यांना चुक लक्षात आली व त्यांनी आमदार पाटील यांचे ‘चरणस्पर्श’ करून भाजप प्रवेश केला. माझ्यावर झालेले ड्रग्जचे आरोप हे राजकीय सुडबुद्धीचा एक भाग आहे, असा खळबळजनक आरोप करीत मनातील व्यथेला वाट मोकळी करून दिली.
अवैध धंदे, पैसा व सत्ता त्यातून पैसा आणि हे झाकण्यासाठी गरिबांना काहीशी आर्थिक मदत, समाज सेवेचे व विकासाचे गोंडस नाव असे चक्र सुरु आहे. तुळजापुरात मटका, ड्रग्ज कोण आणले ? तरुण पिढीला व्यसन कोण लावले? त्याला जबाबदार कोण याचे उत्तर ड्रग्ज स्पेशालिस्ट आमदारांनी देणे गरजेचे आहे. त्या ऐवजी तुळजापूरची बदनामी करता, कोर्टात प्रलंबित विषय अशी कारणे सांगून विषयांतर केले जात आहे उलट त्यांचा आदर करा, उपकृत भावना ठेवा असे आमदार पोटतिडकीने सांगत आहेत.
गंगणे हे भाजपमध्ये असले तरी महाविकास आघाडीतील काही जन सुद्धा मटका व इतर अवैध धंद्यात गुंतले आहेत, ते वास्तव सत्य आहे. ते ही तुळजापूर शहरातील तरुण पिढीच्या नुकसानीला तितकेच जबाबदार आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी चिंतन करून अश्या लोकांना दूर करणे गरजेचे आहे, अन्यथा हा विषय ‘आमचा असा’ तर ‘तुमचा तसा’ अश्या राजकीय आरोप प्रत्यारोपापुरता मर्यादित राहील किंवा ‘तेरी मेरी चुप’ असा बनेल.












