धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषदेत सत्तेचे समीकरण मांडण्याच्या हालचालीना वेग आला असुन सर्वच राजकीय पक्षांची धावपळ सुरु आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गट व भाजप या दोन्ही पक्षांनी अध्यक्षपदावर दावा केला असुन त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. सत्तेसाठी भाजपचे एक नेतृत्व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला त्यांच्या बंगल्यावर गेले होते मात्र तिथे त्यांना 3 तास ताटकळत ठेवण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी भेट नाकारल्यानंतर याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. ‘माऊली’ की ‘मातोश्री’ यापैकी अध्यक्ष पदाच्या खुर्चीवर कोण बसणार याकडे लक्ष लागले असुन जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
भाजप व शिवसेना शिंदे गटासह राष्ट्रवादी, शिवसेना उबाठा, काँग्रेस व इतर पक्षांनी आपापले विजयी उमेदवार शिलेदार सुरक्षित स्थळी नजर कैदेत ठेवले आहेत. शिवसेना शिंदे गटातील 2-3 सदस्य हे भाजपच्या गोटात सहभागी झाले असुन ते त्यांच्या ताब्यात आहेत त्यावरून मोठे वादंग उठले आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सदस्य हे भाजपच्या कळपात असुन माजी आमदार राहुल मोटे यांनी नातेवाईक असलेल्या आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची भेट घेतली असुन महायुतीचे मनोमीलन झाल्याचे स्पष्ट केले. पवार, मोटे, पाटील हे एकमेकांचे नातेवाईक असल्याने झुकते माप आहे.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, आमदार प्रा दर तानाजीराव सावंत यांनी देखील अध्यक्षपदाच्या खुर्चीवर दावा केला आहे, माजी खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी उषाताई यांचे नाव शिवसेनेने पुढे केले आहे तर भाजपकडुन अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांचे नाव पुढे केले आहे. तुमची माऊली तर आमची मातोश्री अशी स्पर्धा लागली आहे. पाटील यांना अध्यक्ष करण्यास सावंत यांचा तीव्र उघड विरोध आहे. सावंत यांची भुमिका महत्वाची व निर्णायक असणार आहे.
शिवसेना उबाठा गट व काँग्रेस ही शिवसेना शिंदे गटाच्या पाठीशी याचं मुद्यावर उभी राहू शकते त्यामुळे समीकरण व भाजपची वाट बिकट झाली आहे. भाजपकडे गेलेले 2 सदस्य आपल्या गोठ्यात आणण्यासाठी शिवसेना नेतृत्व प्रयत्न करीत आहे. या सदस्यांनी नुतन जिल्हा प्रमुख अजित पिंगळे यांच्यासोबत आमदार राणाजगजीतसिंह पाटील, युवा नेते मल्हार पाटील यांची मुंबईत भेट घेत आदरातिथ्य घेतले होते, ही मंडळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटी व सत्कार वेळी गायब होती. ते आपल्या तिकिटावर आले आहेत त्यामुळे त्यांना परत आना असे पक्षादेश दिल्याची माहिती आहे, त्यामुळे ज्यांनी हे ‘कांड’ केले त्यांची दोन्ही बाजुने गोची झाली आहे.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे सत्तेचे समीकरण मांडत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या प्रयत्नात आहेत. शिवसेना मात्र अध्यक्ष पदावर ठाम आहे, माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनी जोरदार फिल्डिंग लावली असुन सावंत यांचे पाठबळ त्यांना मिळत आहे. शिवसेनेचे सदस्य भाजप ताब्यात दिल्यावरून चांगलेच वातावरण तापले आहे. नेते व कार्यकर्ते मुंबईत तळ ठोकून आहेत तर सदस्य यांना संरक्षण देण्यासाठी विश्वासूची फौज पाहरा देण्यासाठी सेवेत हजर आहे.











