धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निकालानंतर शिवसेना पक्षातील एका गटाने दुसऱ्या गटाला पहिला धक्का दिला असुन प्रभारी जिल्हा प्रमुखपदी अजित पिंगळे यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही निवड 18 जानेवारीला करण्यात आली मात्र 9 फेब्रुवारी निकालाचा मुहूर्त साधुन हा बॉम्ब फोडण्यात आला. सुरज साळुंके हे जिल्हाप्रमुख होते त्या जागी आता पिंगळे हे प्रभारी असणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना भाजप जागा वाटप व एबी फॉर्म भाजपकडे देण्यावरून बरेच वादंग झाले होते. त्यानंतर पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व संपर्क प्रमुख राजन साळवी यांनी विश्वासाने एबी फॉर्म पिंगळे यांच्याकडे चुकीच्या हाती दिल्याचे सांगतिले. पिंगळे हे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे असुन त्यांनी हे केले असा आरोप शिवसैनिक यांचा आहे. सेनेतील गदारोळाची ‘बक्षीसी’ म्हणुन जिल्हाध्यक्ष पद ‘बहाल’ केल्याचा आरोप शिवसैनिक यांनी केला असुन आगामी काळात संघर्ष तीव्र होणार आहे.
धाराशिव कळंब शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची नवी जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली, माझ्यावर दिलेली ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानजनक आणि तितकीच मोठी जबाबदारी आहे. या विश्वासाबद्दल लोकसभा शिवसेना गटनेते खासदार डॉ श्रीकांत शिंदे, पालकमंत्री प्रताप सरनाईक, शिवसेना सचिव संजय मोरे आणि संपर्कप्रमुख राजन साळवी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. पक्षाची विचारधारा अधिक बळकट करत संघटन तळागाळापर्यंत मजबूत करण्यासाठी, कार्यकर्त्यांच्या साथीने पूर्ण ताकदीने आणि निष्ठेने काम करण्याचा माझा निर्धार आहे, अशी प्रतिक्रिया पिंगळे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत दिली.









