धाराशिव – समय सारथी धाराशिव नगर परिषदेच्या विद्यमान मुख्याधिकारी वसुधा फड यांनी धाराशिव नगर परिषद अंतर्गत लेखासंहिता 2013 प्रकरण कामे अंतर्गत नियम 138 प्रमाणे कार्यवाही करीता कामाचा छाननी तक्ता तयार करून बोगस बिले काढली असल्याची तक्रार केली आहे. या तक्रारीच्या प्रकरणी चौकशीच्या अध्यक्षपदी धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष यांची नेमणूक करावी अशी मागणी माजी मंत्री सुरेश धस यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे केली आहे. जिल्हाधिकारी डॉ ओम्बासे यांनी याप्रकरणी लक्ष घातले आहे. बोगस बिले प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, चौकशी सुरु असेपर्यंत मुख्याधिकारी फड यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे अशी मागणी धस यांनी राज्याच्या मुख्य सचिवाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
मुख्याधिकारी वसुधा फड यांनी धाराशिव नगर परिषदेमध्ये लेखासंहिता 2013 प्रकरण कामे अंतर्गत नियम 138 प्रमाणे कार्यवाही करणे करीता कामाचा छाननी तक्ता तयार करुन करोडो रुपयांची प्रत्यक्ष स्थळ पाहणी न करता चुकीच्या कामाची बिले अदा केली. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी मुख्याधिकारी याना पत्रव्यवहार करुन खुलासाही मागितला मात्र मुख्याधिकारी यांनी मुदत मागितली. मुदत संपुनही अद्यापपर्यत खुलासा प्राप्त झालेला नाही किंवा त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. या बिलांची माहिती पावसाळी अधिवेशन कामकाजासाठी मागितली होती मात्र ती दिली नाही.
मुख्याधिकारी यांनी काढलेल्या बोगस बिलाची उच्चस्तरीय समिती नेमून त्याची सखोल चौकशी करुन सर्व दोषीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी व ही चौकशी सुरू असेपर्यंत विद्यमान मुख्याधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे अशी मागणी धस यांनी राज्याच्या मुख्य सचिवाकडे केली आहे.