धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या 140 कोटी रुपयांच्या 59 रस्ते कामाच्या निविदा प्रक्रियेतील ठेकेदार अजमेरा व नगर परिषद मुख्याधिकारी यांच्यातील पत्र’व्यवहार’ समोर आला आहे. मुख्याधिकारी, ठेकेदार व नगर विकास विभाग यांच्यात झालेल्या पत्र व्यवहारात तत्कालीन मुख्याधिकारी यांची ‘वाटाघाटी’च्या एका पत्रावर चक्क वेगळी सही आहे. फड यांची नियमित पत्र व्यवहारावर सही एकसारखी असुन ठेकेदार याला दिलेल्या ‘वाटाघाटी’च्या पत्रावरील सही दुसरीच आहे. ही सही त्यांची की अन्य कोणी केली ? हे आता समोर गरजेचे आहे त्यासाठी चौकशीची मागणी होत आहे.
140 कोटी कामात अनेक अनियमितता असुन बीड कॅपिसिटी, बीड व्हॅलिडिटी, वेगवेगळ्या सह्या, काम सुरु झाल्याचे दाखवण्यासाठी संशयास्पद जीपीएस लोकेशन फोटो यासह अन्य बाबींच्या निष्पक्ष चौकशीसाठी आमदार राणाजगजीतसिंह पाटील वगळता पालकमंत्री सरनाईक, राष्ट्रवादीचे आमदार विक्रम काळे, महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, शिवसेना शिंदे गट हे उच्चस्तरीय अधिकारी मार्फत किंवा एसआयटी मार्फत चौकशीची मागणी करीत आहे. तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह यांच्या भूमिकेला भाजपचा पक्ष म्हणुन पाठिंबा आहे का हे मात्र संपर्क केला असता कळु शकले नाही.
3 मे 2025 रोजी ठेकेदार अजमेरा यांना नगर परिषद मुख्याधिकारी वसुधा फड यांच नाव व सही असलेले एक वाटाघाटीचे पत्र पाठवण्यात आले, त्या पत्रावर फड यांची सही नियमित पेक्षा वेगळी असुन त्या पत्रावर जावक क्रमांक देखील नाही, जो की इतर सर्व पत्रावर दिसत आहे. 140 कोटीच्या टेंडर व्यवहारात प्रत्येक पत्रावर जावक क्रमांक आहे मात्र यावर नाही. इतक्या महत्वच्या पत्रावर सही व जावक नंबर नसणे संशयास्पद आहे.
कंत्राटदार अजमेरा यांची निविदा 15 टक्के पेक्षा जास्त दराने प्राप्त असुन अंदाजपत्रकीय दराने काम करणेरकीता वाटाघाटी कराव्यात. कंत्राटदार अंदाजपत्रकीय दराने काम करण्यास तयार नसल्यास फेर निविदा मागविण्यात याव्यात, असे पत्र नगर परिषद प्रशासन संचालनालय यांनी वसुधा फड यांना 2 मे रोजी दिले होते. त्याच्या आधारे 3 मे ला फड यांनी अजमेरा यांना पत्र काढले त्यानुसार, आपण अंदाजपत्रकीय दराने काम करण्यास तयार असल्यास 5 मे सोमवारी दुपारी 4 वाजेपर्यंत आपले लेखी म्हणणे या कार्यालयास सादर करावे. अन्यथा आपले काहीही म्हणणे नाही असे ग्राह्या धरून फेर निविदा काढण्यात येतील. इतक्या महत्वाच्या पत्रावर सही चक्क वेगळी असुन जावक क्रमांक नसल्याने संशय वाढला आहे. 3 मे रोजी त्या महिन्यातील पहिला शनिवार होता, सुट्टीच्या त्या दिवसातील घडामोडीची चौकशी होणे गरजेचे आहे.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या 26 मे 25 रोजीच्या लेखी तक्रारीत तत्कालीन मुख्याधिकारी वसुधा फड यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला होता. प्रकल्पच्या प्रारूप निविदा मसुद्यास राज्यस्तरीय प्रकल्प समितीची मंजुरी घेण्यात आली नाही. बीड कॅपिसिटी प्रमाणपत्रावर सर्व निविदाधारक यांचे कामाचे तपशील नमुद नसुन बीड व्हॅलिडिटी काळ वाढवला नाही. मुख्याधिकारी यांनी स्वतःचा संभाव्य आर्थिक फायदा पाहता निर्णय घेतल्याचा संशय व्यक्त केला होता. राजकीय हीतसंबंध जोपासुन 15 टक्के जादा दराने निविदा स्वीकारली, त्यामुळे शिस्तभंग व निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी केली. पालकमंत्री यांनी उपस्थिती केलेल्या मुद्याना राज्यस्तरीय समितीने पुष्टी दिली, 11 जुनच्या इतिवृत्तानुसार फेरनिविदा राबवण्याची शिफारस केली, त्या बैठकीला फड व्हीसीद्वारे उपस्थितीत होत्या.
या सगळ्या प्रकारानंतर फड यांची बदली करण्यात आली, फड यांचे निलंबन करा असे निर्देश होते. ‘गंगाधर ही शक्तीमान है’ असे म्हणत टेंडर व ठेकेदार यांचे ओझे डोक्यावर घेतलेल्या धाराशिव जिल्ह्यातील एका नेत्याने राजकीय ‘वजन’ वापरून बदलीवर हे प्रकरण थांबावले. पालकमंत्री यांच्या 30 सप्टेंबरच्या पत्रात फड यांची या कामामध्ये केलेला विलंब, हलगर्जीपणा व अपारदर्शकता या कारणामुळे बदली केल्याचे नमुद आहे.












