धाराशिव – समय सारथी
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथील 37 वर्षीय सतीश मुंडे यां तरुणाच्या हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपीना अटक केली असुन त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. घटनेपुर्वी मुंडे व आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातील महाकाली कला केंद्रावर तमाशा पाहायला आले होते. त्या ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी चौकशीसाठी जप्त केले आहे.
ज्या नर्तिकाचा नाच मयत मुंडे व आरोपीनी पाहिला त्यांना व तेथील व्यवस्थापक यांना चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. नृत्य पाहताना आरोपी व मयत यात काही वाद झाला का ? तिथे त्यांच्यात काय संवाद झाला याचा तपास पोलिस करीत आहेत. या चौकशीतुन काय निष्पन्न होते हे पाहावे लागेल.
सतीश मुंडे हा आपल्या काही मित्रांसह धाराशिव जिल्ह्यातील महाकाली कला केंद्रावर बारी पाहण्यासाठी गेला होता. मित्रांनी दारू पाजून त्याला बारी पाहण्यासाठी नेले आणि तमाशा पाहून परत जाताना जुन्या भांडणाचा राग मनात धरून जीवे मारल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी येरमाळा पोलिस ठाण्यात 5 जणाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वडील भागवत मुंडे यांनी तक्रार दिली.
आरोपीनी लाथा बुक्क्यांनी सतीश मुंडे याच्या पोटावर आणि छातीवर मारहाण केली. यातच त्याचा मृत्यू झाला. शेख आजमुद्दीन, शेख रौफ, संजय गीते, मधुकर इंगळे आणि दत्ता तोंडे अशी आरोपींची नावे आहेत. पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील भोजगुडे तपास करीत आहेत.











