धाराशिव – समय सारथी
वाशी तालुक्यातील शिवसेना उबाठा पक्षाच्या उपतालुका प्रमुखाने शेतात कांद्याच्या पिकात अफूची लागवड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर त्याची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अफू लागवड प्रकरणी गुन्हा दाखल झाला असुन उप तालुका प्रमुख समाधान मनोहर उघडे याची पक्षातून तात्काळ हकालपट्टी करण्यात आली आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. चौफेर टिकेनंतर ही कारवाई केली आहे.
शिवसेना हा शिस्तप्रिय आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करणारा पक्ष आहे. पक्षाच्या विचारसरणीला आणि शिस्तीला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बेकायदेशीर कृत्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात कधीही थारा दिला जात नाही. समाधान उघडे यांनी केलेले कृत्य हे अत्यंत गंभीर असून ते संघटनेच्या शिस्तीला तडा देणारे आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार समाधान उघडे यांची पक्षातून तत्काळ हकालपट्टी करण्यात येत आहे. यापुढे त्यांचा पक्षाशी कोणताही संबंध नसेल.
वाशी तालुक्यातील दसमेगाव शिवारात वाशी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव यांनी संयुक्त कारवाई करत अफूची बेकायदेशीर शेती उद्ध्वस्त केली. कांद्याच्या पिकामध्ये लपवून केलेली ही लागवड उघडकीस आणत पोलिसांनी तब्बल 486 किलो अफूची झाडे व बोंडे जप्त केली असून जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 72 लाख 84 हजार इतकी होती.
पोलीस अधीक्षक रितु खोकर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार व वाशीचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सपोनि सुदर्शन कासार, सपोनि यशवंत घोडके तसेच अंमलदार शौकत पठाण, जावेद काझी, कपील बोरकर, गणेश खैरे, श्रीनिवास घुले, विकास जगताप व ज्योती बहीरवाल यांच्या संयुक्त पथकाने सहभाग घेतला.











