धाराशिव – समय सारथी
महिला वनरक्षकाला धमकी देत धक्काबुकी करून शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या दत्ता मोहन तुपे (रा. येडशी, ता. धाराशिव) या आरोपीस धाराशिव सत्र न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी व 21 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. जिल्हा सरकारी वकील महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए. डी. देव यांनी कोर्टाने शिक्षा ठोठावली.
वनरक्षक उषा शंकर जाधव या रामलिंग घाट वन्यजीव अभयारण्य कार्यालयात नियमित कामकाज करीत असताना आरोपी तुपे हा कार्यालयात घुसला. वरिष्ठांकडून माहिती घेण्याऐवजी थेट फिर्यादींकडे माहिती मागणे, राजकीय दबाव टाकणे, हुज्जत घालणे यासोबतच त्यांच्या अंगावर धावून जात धक्काबुकी केल्याचा आरोप आहे. ‘बघून घेतो’ अशी धमकीही आरोपीने दिल्याचे तपासात समोर आले. या प्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 228/23 अंतर्गत कलम 353,354,323,506 भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
तत्कालीन पोलीस निरीक्षक आर. एस. गायकवाड यांनी तपास पूर्ण करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. सरकारी पक्षाने चार साक्षीदारांचे जबाब नोंदवून प्रकरण ठोस पुराव्यांसह सिद्ध केले. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए. डी. देव यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून आरोपी तुपे यास दोषी ठरवीत पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. तसेच 21 हजार रुपयांचा दंडही ठोठावला. या खटल्यात जिल्हा शासकीय अभियोक्ता ऍड महेंद्र बी. देशमुख यांनी तर कोर्ट पॅरवी पो.कॉ. कुंभार (धाराशिव ग्रामीण) यांनी केली.












