सत्ता स्थापनेची गणिते, आकडेमोड सुरु – भाजपसह शिवसेनेकडून अध्यक्षपदावर दावा
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर मिनी मंत्रालय अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी रणनीती आखली जात आहे. भाजप शिवसेना राष्ट्रवादी अप महायुतीला या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाले असल्याने भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी अध्यक्षपदावर दावा केला आहे. तुमची ‘माऊली’ तर आमची ‘मातोश्री’ असे काहीसे सुरु असुन त्यात उषा गायकवाड यांनी जिल्ह्यातील सर्वाधिक 6 हजार 290 मतांनी कदेर गटातून विजय मिळवल्याने दावा आणखी मजबूत झाला आहे. अध्यक्षपदाचा ‘तो’ चेहरा कोण ?
भाजप कडुन सुरुवातीपासुन ‘माऊली’ असे म्हणत अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांचे नाव पुढे केले जात आहे तर शिवसेना शिंदे गटाला यावेळी तुल्यबळ जागा मिळाल्याने त्यांनी सुद्धा दावा केला आहे. शिवसेनेच्या एका गटाकडुन उषा रवींद्र गायकवाड यांचे नाव पुढे केले जात आहे. सावंत गटाकडुन अद्याप याबाबत कोणते नाव पुढे आलेले नाही. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी सुद्धा अध्यक्ष पदावर शिवसेनेचा दावा असेल असे म्हणटल्याने राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव आहे, 55 पैकी 16 गटात या प्रवर्गमधील महिला आहेत. 55 जागा पैकी 19 जागावर भाजपने विजय मिळवीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महायुतीतील शिवसेना शिंदे गटाला 15 जागा, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 6 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना उबाठा गटाला 7, 3 काँग्रेस, 4 अपक्ष, 1 समाजवादी पार्टीला मिळाली आहे. महायुतीला 40 जागा मिळाल्या असुन स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महाविकास आघाडीला 10 व अपक्ष 4 व 1 समाजवादी पार्टी असे संख्याबळ आहे.
अजित पवार नातेवाईक असणे व भाजपाने आपले काही उमेदवार शिवसेना शिंदे गटाच्या चिन्हावर निवडून आणल्याने भाजपाच्या अध्यक्षपदाचा मार्ग सुकर झाल्याचे चित्र असले तरी पक्षचिन्ह, व्हीप व इतर अनेक तांत्रिक व राजकीय मुद्दे आहेत त्यामुळे अध्यक्षपदाची वाट तितकी सुकर असणार नाही. त्यातच भुम परंडा वाशी येथे सावंत यांच्या विरोधात भाजपा नगर परिषद व जिल्हा परिषद निवडणुकीत होती त्यामुळे सावंत सहज महायुतीला व पाटील यांच्या अध्यक्षपदाच्या नावाला अर्थात अर्चना पाटील यांच्या नावाला पाठबळ देणार नाहीत. भाजपला ते खिंडीत गाठू शकतात.
शिवसेनेला 15 जागा मिळाल्या असुन त्यातील 8 जागा ह्या भुम परंडा वाशी येथील अर्थात आमदार सावंत समर्थक यांच्या आहेत तर 7 जागा उर्वरित आहेत. सावंत यांचे शिवसेना गटात बहुमत असले तरी त्यांनी सुचवलेल्या नावाला दुसरा गट समर्थन देण्याची शक्यता कमीच आहे, त्या गटाची व आमदार पाटील यांचे मनोमिलन झाले आहे. जागा वाटपाप्रमाणे अध्यक्षपदाचा विषय मुंबईत चर्चेला जाऊ शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची भुमिका महत्वाची असणार आहे.
महायुतीने सत्ता स्थापनेवर दावा केला असला तरी कोणत्या पक्षाला उपाध्यक्ष व सभापती पदे मिळणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राजकीय हालचालींना सध्या कमालीचा वेग आला असून, पुढील काही दिवसांत जिल्हा परिषदेत नवे राजकीय समीकरण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. जागा कमी आल्याने शिवसेना उबाठा गट, काँग्रेसच्या गोटात सध्या शांतता असुन सावंत यांच्या भुमिकेवर त्यांची मदार अवलंभुन असल्याचे दिसते.
‘माऊली’ की ‘मातोश्री’ की ‘सामान्य’ अशी चर्चा व तर्कवितर्क लावले जात आहेत. सामान्य कार्यकर्ताची निवडणूक असे नेते मंडळी म्हणत असली तरी घराणेशाहीच्या प्रेमापोटी पक्षीय तत्वाना तिलांजली देण्यात आल्याचे उमेदवारी वाटपावेळी अनेक पक्षात दिसुन आले. आता अध्यक्ष पदाच्या वेळी घराणेशाहीला पोषक की इतर कोणता ‘पॅटर्न’ राबवला जातो याकडे लक्ष लागले आहे. सामान्य कार्यकर्ता अध्यक्ष केला तरी अनेक वेळा तो नामधारी सही पुरता मर्यादित अधिकार क्षेत्र मग राजघरातला बरा, असाही एक सुर आहे.











