धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेच्या महायुतीतील जागा वाटप, बंड, एबी फ्रॉम व उमेदवारीवरून बरेच वादंग झाले आहे. त्यातच तुळजापूर तालुक्यातील शहापुर जिल्हा परिषद गटात पुणे येथील मारणे टोळीतील गुंड सुनील बनसोडे हा निवडणुकीच्या रिंगणात असल्याने भर पडली आहे. उमेदवारीबाबत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते अनभिज्ञ असुन या उमेदवारीला निकष व दुरदृष्टी कोणती ? हाच का शिवसेनेचा चेहरा ? असा सवाल शिवसैनिक करीत आहेत.
लोहारा, तुळजापूर व उमरगा या भागातील उमेदवारांच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत असुन ते यावर काय भुमिका स्पष्ट करतात याकडे लक्ष लागले आहे. भुम परंडा वाशी युती फिस्कटली असुन तिथे आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष भाजप विरुद्ध लढत आहे. सावंत हे शिवसेनेचे आमदार असले तरी त्यांना शिवसेनेच्या एका गटाने व भाजपने सोईस्करपणे दुर केले असुन बॅनरसह अन्य ठिकाणी स्थान दिले नाही. शिवसेनेत 2 गट पडल्याचे दिसते त्यातील दुसरा गट उद्या काय भुमिका घेणार ? सावंत सभेला येणार का ? मुख्यमंत्री काय बोलणार हे पाहावे लागेल.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी धाराशिव जिल्ह्यात येत आहेत. 4 फेब्रुवारी रोजी लोहारा येथील बसवेश्वर मैदानात दुपारी 12 वाजता ही प्रचार सभा होत आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनाखाली ही सभा होत आहे. माजी आमदार ज्ञानराज चौगुले, तुळजापूर व उमरगा लोहारा जिल्हा प्रमुख मोहन पनूरे, युवा सेना जिल्हा चिटणीस आनंद पाटील हे या सभेचे नियोजन करीत आहेत.
तुळजापूर तालुक्यातील शहापूर ही एकमेव जागा शिवसेना महायुती म्हणुन लढत आहे, त्या जागेवर पुणे येथील मारणे टोळीचा ‘शार्प शुटर’ अशी गुन्हेगारी जगतात ओळख असलेला ‘टॉप हॅन्ड’ सुनील बनसोडे हा रिंगणात आहे. बनसोडे याने भाजपकडुन सुद्धा उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांनी सेफ गेम खेळला. शिवसेनेने विश्वास दाखवीत उमेदवारी दिली, हा चर्चेचा विषय ठरला आहे. बनसोडे हे गटाबाहेरील असुन त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबत ठोस माहिती शिवसैनिकांना नाही. मारणे टोळी ही वेगवेगळ्या पक्षातुन राजकारणात एन्ट्री करीत जम बसवीत आहे.
लोहारा तालुक्यात शिवसेना कानेगाव येथून सुवर्णा सतीश पाटील, माकणी सरोजा विजय पाटील व जेवळी येथून श्रुती मोहन पनूरे अश्या 3 जागा लढवीत आहे. उमरगा तालुक्यात सेनेला 9 पैकी 2 जागा मिळाल्या असुन कवठा येथून सिद्धेश्वर रघुनाथ माने व कदेर येथून उषा रवींद्र गायकवाड ह्या लढवीत आहेत. नेत्यांनी आपआपल्या जागा सेफ केल्या आहेत.
धाराशिव जिल्ह्यात अधीकांश ठिकाणी महायुती झाल्याचा दावा भाजप करीत असुन 55 पैकी 23 जागा शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर लढत आहे. त्यात परंडा 5, वाशी 3 व भुम 5 अश्या सर्व 13 ठिकाणी भाजप व शिवसेना उमेदवार आमने सामने आहेत. भुम परंडा वाशी येथे शिवसेना भाजप महायुती फिस्कटली आहे, त्या 13 जागा व माकणी येथे मैत्रीपुर्ण लढत होत आहे. अश्या 14 जागा महायुती असली तरी एकमेका विरोधात लढत आहे. महायुतीसह उपमुख्यमंत्री शिंदे कोणत्या मुद्यावर बोलतात याकडे लक्ष लागले आहे.












