पत्रकारांनी दिली होती बदनामीची धमकी – जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासेंचा धक्कादायक आरोप
धाराशिव – समय सारथी
नॉन क्रेमीलिअर प्रकरणात केलेले आरोप तथ्यहीन असुन कायदेशीर कारवाई करू, या प्रकरणात काही खासगी व्यक्ती व काही 1-2 पत्रकारांनी तुमची बदनामी करू अशी धमकी दिल्याचा धक्कादायक आरोप जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी पत्रकार यांच्याशी संवाद साधताना केला. जिल्हाधिकारी यांच्या या खुलासानंतर एकच खळबळ माजली आहे.
गेल्या काही महिन्यापासुन माझ्या विरोधात नॉनक्रेमीलिअरबाबत उलटसुलट चर्चा व बदनामीचे षडयंत्र सुरु होते त्यावेळी मी काही खुलासा केला नाही मात्र आता सोशल मीडियावर माझ्या विरोधात बातमी आल्याने खुलासा देत आहे असे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी सांगितले. माझ्या आईने कधीही आयुष्यात नौकरी केली नाही, ती गृहिणी आहे त्यामुळे ती बातमी चुकीची आहे. मी युपीएससी परीक्षा 2008 पासुन देत होतो, मी केंद्रीय लोकसेवा आयोगाची 5 वेळेस परीक्षा दिली, त्यातील 4 वेळेस परीक्षा ही खुल्या गटातुन दिली. वडिलांचे आर्थिक उत्पन्न नॉन क्रेमीलिअर नियमापेक्षा जास्त असल्याने पहिले 4 वेळेस परीक्षा ही खुल्या गटातुन दिली. वडील सेवानिवृत्त झाल्यानंतर आर्थिक उत्पन्न कमी झाले त्यामुळे त्यानंतर त्या गटातुन परीक्षा दिली. मी माझे त्यावेळचे उत्पन्नची माहिती आयोगाकडे वेळोवेळी सादर केली आहे याबाबत कोणाला शंका असेल तर ते याबाबत तक्रार करू शकतात, त्यात काही अडचण नाही असेही ते पत्रकार परिषदेत म्हणाले.
माझ्या आजवरची प्रशासकीय कारकीर्द कोणीही तपासून पहावी, मी आजवर चार आणे घेतले नाहीत किंवा कोणालाही दिले नाहीत. दुसऱ्यावर आरोप करणे सोपे आहे त्यात काय तथ्य असेल तर संबंधित विभागाकडे जावे. संपुर्ण माहिती योग्य त्या फॉरमॅटमध्ये आयोग व इतर विभागाकडे दिली आहे, त्यात लपविण्यासारखे काही नाही,वस्तूस्तिथी सगळ्यांसमोर आहे. सगळी माहिती ही इंटरनेटवर उपलब्ध आहे त्यामुळे त्यात चुकीचे काही केले नाही.
आरोप सगळ्याच लोकांवर केले जातात, सगळेच लोक चोर आहेत असे नाही, त्या दृष्टीने तक्रार करतात. जिल्ह्यात कामाच्या अनुषंगाने ओळख झालेले एक दोन पत्रकार आहेत, या प्रकरणात त्यांनी ही माहिती उघड करू, तुम्हाला बदनाम करू असे सुद्धा म्हणाले, मी या गोष्टीला गांभीर्याने घेतले नाही, त्यांना सांगितले की तुम्ही माझी तक्रार करू शकता. बदनामी व इतर बाबींच्या अनुषंगाने कायदेशीर सल्ला घेऊन त्यांच्यावर कारवाई करू असे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे म्हणाले.