धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरात घरभाड्याच्या वादातून मारहाण झाल्याची गंभीर घटना समोर आली असून भाडे मागितल्यावरून झालेल्या वादातुन घरमालकावर लोखंडी कोयत्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असुन 26 टाके पडल्याने राजाभाऊ स्वामी हे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केले असुन कोर्टाने न्यायालयीन कोठडी सुनावल्याने जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.
राजाभाऊ शिवाय्या स्वामी यांच्या जागेत राजेश अनिल झोंबाडे हा भाड्याने राहत होता. मागील दोन महिन्यांपासून त्याने घरभाडे दिले नव्हते, यावरून दोघात शाब्दिक चकमक व वाद झाला. भाडे द्या अन्यथा जागा खाली करा असे म्हणल्यावर भाडे दिले मात्र शिवीगाळ केल्याचे काय ? यावरून वाद झाला व बाळा जास्त शहाणपणा करू नको असे स्वामी म्हणताच त्याचे परिवर्तन जीवघेण्या हल्ल्यात झाले. रागाच्या भरात त्याने लोखंडी कोयता उचलून राजाभाऊ स्वामी यांच्या डोक्यावर व पाठीवर वार करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 26 टाके पडले असून उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यातगुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपीविरुद्ध BNS कलम 109, 352, 351(2) तसेच शस्त्र अधिनियम 1959 अंतर्गत कलम 4 व 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप शहाजी ओहोळ करीत आहेत.












